बारामतीत काही दिवसांपूर्वी मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. बारामतीमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील काजवे टी पॉइंटवर चहा बनवणाऱ्या हेमंत भिसे याला तीन तरुणांनी मारहाण केली होती. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल झालं होतं. यानंतर या घटनेतील चारपैकी दोन आरोपींना बारामती शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं. जुन्या वादातून ही मारहाण झाल्याचं अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितलं आहे. दरम्यान या घटनेची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दखल घेतली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते बारामतीमध्ये अपंग बांधवांना इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी अजित पवारांनी या घटनेचा उल्लेख करताना सज्जड दम भरला. मी पोलिसांना सांगितलं आहे उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता, कुणीही असलं आणि त्याच्या मुलाने जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा असं ते म्हणाले.
"मी एक व्हिडीओ पाहिला दोन मोटारसायकवरुन चार मुलं आली आणि त्यांनी एकाला बेदम मारहाण केली. तुमच्यातील काहींकडेही ती क्लिप आली असेल. पट्ट्याने काय मारतोय वैगेरे. एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण कशाला मुक्या प्राण्याला मारतो असं म्हणतो. मरेपर्यंत त्याला मारलं. लाथा काय मारत होते. फुटबॉल खेळत असल्याप्रमाणे लाथा मारत होते. मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता, कुणीही असलं आणि त्याच्या मुलाने जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा. मी असलं अजिबात खपवून घेणार नाही," असा दम अजित पवारांनी भरला.
"असे गुन्हे करत राहिले तर मकोकाही लावेन. मेहरबानी करा, पण कायदा हातात घेऊ नका. काहीजण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणालाही बदडून काढत आहेत ठोकून काढत आहेत," असाही संताप त्यांनी व्यक्त केला.