मलिदा गँगने मला नकोसं केलं आहे असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. फोटो काढून कामं होत नाहीत असं सांगत त्यांनी सुप्रिया सुळेंवरही निशाणा साधला. राज्याचे उपमुख्यमंत्री आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी बारामतीच्या माळेगावमध्ये शेतकरी मेळावा पार पडला. या शेतकरी मेळाव्यात अजित पवार प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
"काहीजण म्हणाले अजित पवारांच्या ताब्यात इतर कारखाने आहेत म्हणून अजित पवारांनी माळेगाव कारखान्याला 2800 रुपयांच पेमेंट काढायला भाग पाडले. पण कर्जाचा बोजा डोक्यावर न चढता चांगला भाव कसा देता येईल असा आमचा प्रयत्न असतो. माझ्यात जीवात जीव असेपर्यंत माळेगावला धक्का लागू देणार नाही. ज्या दिवशी मला जमणार नाही त्या दिवशी जाहीर सभा घेऊन सांगेन ते आजपासून मला जमणार नाही," असं म्हणत अजित पवार यांनी नाव न घेता युगेंद्र पवारांना लक्ष केलं.
तर बारामती तालुक्यात चालू असणाऱ्या विकास कामावरूनही अजित पवार संतापल्याच पाहायला मिळालं. या मलिदा गँगने तर मला नकोसं केलं आहे असं म्हणत अजित पवारांनी थेट रोषच व्यक्त केला. एकतर पुढारपण करा नाहीतर कॉन्ट्रॅक्ट बघा असं म्हणत अजित पवारांनी भरसभेत ठेकेदारांना आणि पुढाऱ्यांना झापलं.
"मी तुमची विकासाची कामे करण्यासाठी निवडून येतो. विकासात कुठे कमी पडलो तर जाब विचारा. 100 दिवस सरकारला झाले आहेत अन् शंभर दिवसात बारामतीला 1000 कोटी रुपये विकासासाठी आणले आहेत. मी बाकीच्यांसारखं कुठं भेटायला गेलो की फोटो काढत नाही, नमस्कार करायचा आणि फोटो काढायचा. फोटो काढून प्रश्न सुटत नाही. त्यासाठी प्रशासनावर दरारा असायला लागतो," असं म्हणत अजित पवारांनी आपल्या भगिनी खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता लक्ष्य केलं.