छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारं साहित्यावर बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. बदनामीकारक नाटकं, चित्रपट आणि कादंबऱ्या कायमस्वरूपी हद्दपार करण्याची मागणी अमोल मिटकरींनी केली आहे. अमोल मिटकरींच्या या मागणीला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठींबा मिळताना दिसत आहे.
स्वराज्याचा छावा, स्वराज्य रक्षक युवराज छत्रपती संभाजी महाराज यांची अनेक कादंबऱ्या, नाटकं आणि चित्रपटांमधून बदनामी करण्यात आली आहे. शंभूराजांची बदनामी करणारी नाटकं, कादंब-या आणि चित्रपट कायमस्वरुपी हद्गपार करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे.
- बेबंदशाही, राजसंन्यास आणि रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांवर बंदी घालावी
- मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा या भालजी पेंढारकरांच्या चित्रपटांना हद्दपार करावं
- पाठ्यपुस्तकांमध्ये संभाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश व्हावा
- तिथीचा वाद मिटवण्यासाठी शासनानं एक अभ्यासमंडळ स्थापन करावं
अशा मागण्या अमोल मिटकरी यांनी केल्या आहेत.
मंत्री शंभूराज देसाई यांनी अमोल मिटकरी यांच्या या मागणीला पाठिंबा दिला आहे. बदनामीकारक मजकूर असलेली नाटकं आणि साहित्याबाबत सरकारकडून विचार करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यानी केली आहे.
संभाजी महाराजांचा इतिहास ज्वलंत आहे. त्यांचा चुकीचा इतिहास नवीन पीढीसमोर जायला नको अशी भूमिका छगन भूजबळ यांनी मांडली आहे. महापुरूषांच्या बाबतीतील साहित्य, नाटकं, चित्रपट यांच्या बाबतीत सेन्सॉर असावा अशी मागणी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
संभाजी महाराजांच्या इतिहासाचं अनेकांकडून विद्रुपीकरण करण्यात आल्याचा अनेक इतिहास अभ्यासकांचं मत आहे. आता अमोल मिटकरी यांनी संभाजी महाराजांचा चुकीच्या इतिहास रंगवणाऱ्या कादंबऱ्या नाटकं आणि चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यावर सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.