Vaishnavi Hagawane Death Case Updates: पुण्यातील बावधन मध्ये सुनेच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे अजूनही फरार असल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. पोलिसांवर राजकीय दबाव तर नाही ना असा प्रश्न निर्माण यानिमित्ताने निर्माण झाला आहे. दरम्यान या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा सासरे राजेंद्र हगवणेसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर आरोप आहे. लग्नावेळी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी अन् चांदीची भांडी देण्यात आली होती. तरी जमीन खरेदीसाठी 2 कोटींच्या मागणीचा तगादा लावला होता. इतकंच नाही तर पती शशांक हा चारित्र्यावरून संशय घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुण्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हागवणे यांची सून वैष्णवी हिने 16 मे रोजी आत्महत्या केली. वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दीर सुशील हगवणे आणि नणंद करिश्मा यांच्या विरोधात हत्येचा आरोप करत बावधन पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मात्र राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे पुण्यातील मुळशी तालुकाध्यक्ष आहेत, त्यामुळंच सून वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी त्यांना अटक होत नाही. या चर्चेत तथ्य नाही असं म्हटलं आहे. पोलिसांची तीन पथकं त्यांच्या शोधात असल्याचा दावा बावधन पोलिसांनी केला आहे. वैष्णवीची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
आत्महत्येपूर्वी तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचा, तिला मारहाण केल्याचं, शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. त्यामुळं सुनेला आत्महत्येस प्रवृत्त आणि हुंडाबळी केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि सासरे राजेंद्र हगवणेंसह सासू, पती शशांक, नणंद आणि दिरेवर गुन्हा दाखल आहे. यापैकी पती शशांक, सासू आणि नंदेला अटक करण्यात आलीये तर सासरे राजेंद्र आणि दिराचा शोध सुरुये.
एकीकडे पोलिस राजेंद्र हगवणे यांचा शोध सुरू असल्याचा दावा करत असताना वैष्णवी यांच्या कुटुंबीयांनी मात्र हगवणे यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. अजित पवार हे स्वतः वैष्णवीच्या लग्नात होते, त्यांनी आशीर्वादही दिले होते. दादांनी लाडक्या बहिणीला न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा सासरे राजेंद्र हगवणेसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर आरोप आहे. प्रेम विवाहावेळी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी अन चांदीची भांडी देण्यात आली. तरी जमीन खरेदीसाठी 2 कोटींच्या मागणीचा तगादा लावला होता. तसंच पती शशांक हा चारित्र्यावरून संशयही घेत होता. वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानं राजेंद्र हगवणेंची लहान सून वैष्णवीचा जीव गेला. अगदी असंच काहीसा मोठ्या सुनेचाही छळ हगवणे कुटुंबीयांनी केला होता. नोव्हेंबर 2024मध्ये तिने पौड पोलीस स्टेशनमध्ये तसा गुन्हाही दाखल केला आहे.
सासरे राजेंद्र यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली अन मनास लज्जा निर्माण होईल असं कृत्य केलं. मात्र तेंव्हा ही राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तेंव्हाच कठोर कारवाई झाली असती तर कदाचित लहान सून वैष्णवीवर हे टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली नसती. आता एवढं होऊन ही अजित पवारांचे पदाधिकारी असलेले सासरे राजेंद्र पोलिसांच्या हाती लागेना झाले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.