Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'18 सेकंदांचा व्हिडीओ' सांगत कोकाटेंचा इशारा; रोहित पवारांनी 6 सेकंद वाढवत दिलं उत्तर; शेअर केला नवा VIDEO

Manikrao Kokate New Video: 18 सेकंदाच्या व्हिडीओत मी स्कीप करण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढाच व्हिडीओ शूट करुन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत असा दावा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला आहे.   

'18 सेकंदांचा व्हिडीओ' सांगत कोकाटेंचा इशारा; रोहित पवारांनी 6 सेकंद वाढवत दिलं उत्तर; शेअर केला नवा VIDEO

Manikrao Kokate New Video: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपण सभागृहात रमी खेळतानाचा आरोप फेटाळून लावला आहे. आपण आयुष्यात कधीच रमी खेळलो नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसंच आपण जाहिरात स्कीप करत असताना, फक्त 18 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करुन आरोप प्रत्यारोप केले जात असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. त्यानंतरचा व्हिडीओ जाणुनबुजून शेअर करण्यात आला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. यानंतर रोहित पवार यांनी एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ 22 सेकंदाचा आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा दावा फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच पुन्हा एकदा राजीनाम्याची मागणी केली आहे.

'...तर मी राजीनामा सादर करणार', कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी केलं जाहीर

 

हा व्हिडीओ शेअर करताना रोहित पवारांनी लिहिलं आहे की, "सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो?".

"विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती," असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

"विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता?," अशी विचारणाही त्यांनी केली आहे. 

कोकाटेंनी काय म्हटलं आहे?

"हाऊसमध्ये माझं काम होतं, लक्षवेधी होती. माझ्या ओएसडी किंवा इतरांकडून माहिती मिळवण्यासाठी फोन किंवा मेसेज करावा लागतो. त्यासाठी मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यानंतर त्यावर मोबाईल गेम पॉप अप झाला. एक एका सेकंदाला गेम येत असतात. मोबाईल नवा असल्याने मला तो स्कीप करता आला नाही. पण स्कीप केल्यानंतरचा व्हिडीओ समोर आलाच नाही. आपण 5 जीमध्ये असल्याने मोबाईलवर एकामागोमाग गेम पॉप अप होतात आणि ते स्कीप करावे लागतात. हा फक्त 18 सेकंदाचा व्हिडीओ आहे. त्यात मी स्कीप करण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढाच व्हिडीओ शूट करुन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. माझा खेळण्याचा काही हेतू नव्हता. पूर्ण दाखवलं असतं तर काहीही तथ्य नसल्याचं लक्षात आलं असतं," असा दावा माणिकराव कोकाटेंनी केला आहे. 

"मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे आरोप बिनबुडाचा आणि चुकीचा आहे. या आरोपांमुळे महाराष्ट्रात माझी बदनामी झाली आहे. कारण नसताना ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला, बदनामी केली आहे त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Read More