Manikrao Kokate : विधीमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आणखी वाढल्या. सुरुवातीला शेतकऱ्यांविषयीचं बेताल वक्तव्य आणि त्यानंतरचा व्हायरल व्हिडीओ यामुळं त्यांचं मंत्रीपद धोक्यात आलं आणि विरोधकांकडून सातत्यानं कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
राजकीय घडामोडींना वेग आला, खुद्द कोकाटे अजित पवारांच्या भेटीला आले. जिथं अजित पवारांकडून कोकाटेंना समज देणयात आली आणि कोकाटेंनी माफी मागितल्यानं त्यांना अभय मिळाल्याची माहिती सूत्रांमार्फत समोर येताच चर्चांना उधाण आलं. मात्र विरोधकांचा सततचा विरोध पाहता अखेर कोकाटेंना कृषीमंत्रीपदावरून हटवत त्यांच्या वाट्याला क्रीडा व युवक कल्याण खात्याचं मंत्रीपद देण्यात आलं.
कोकाटेंना मंत्रीमंडळातूनच हटवण्याची मागणी विरोधक सातत्यानं करत असताना त्यांची क्रीडा व युवक कल्याण खात्यासाठी बदली करणं हा निर्णय पटला नसल्यानं विरोधी बाकावरील अनेक नेत्यांनी सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयाचा निषेध केला. राष्ट्रवादी SP च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला खोचक टोलाही लगालवला आणि तितक्याच कठोर शब्दांमध्ये झापलंसुद्धा.
'एकिकडे राज्यातील तरुण पिढी ऑनलाईन रमीच्या मागे लागून बरबाद होत आहे. तिच्यावर बंदी घालण्याची मागणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून क्रीडा व युवक कल्याण यासारखे महत्वाचे खाते दिले जाते यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही', असं म्हणत त्यांनी महायुती सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला.
राज्यातील कृषी क्षेत्र पुर्णपणे कोलमडून पडलेले असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील? याहून कहर म्हणजे या कृषीमंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील ? याची शंका आल्याशिवाय राहत नाही.…
— Supriya Sule (@supriya_sule) August 1, 2025
अजित पवारांनी समज दिल्यानंतर झालेल्या या राजकीय घडामोडीवर एका अर्थी त्यांनाही सुप्रिया सुळेंच्या या प्रतिक्रियेमुळं आता त्यावर सत्ताधारी नेमके कसे व्यक्त होतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असेल. शिवाय राज्याच्या राजकारणात येत्या दिवसाच नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात आणि माणिकराव कोकाटे या नव्या खात्याची जबाबजदारी कशी पार पाडतात यावर विरोधकांची नजर असेल हे खरं.