Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन चांगलाच वाद पेटलाय. दिशावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय. मात्र, मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशानं आत्महत्याच केल्याचं उघड झालंय. तसंच कौटुंबिक आणि आर्थिक कारणांमुळे तिने आत्महत्या केल्याचं देखील रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आलंय. दरम्यान मालवणी पोलिसांच्या या रिपोर्टवरुन दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझांनी उद्धव ठाकरेंवरच आरोप केलाय. ओझांनी आरोप केलाय की, 'ठाकरेंनी मालवणी पोलिसांना न्यायाधीशांचे अधिकार दिले का? कोर्टानं रिपोर्ट स्वीकारला नाही', या शब्दात त्यांनी आरोप केला आहे.
मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवरुन नितेश राणेंनी देखील सवाल उपस्थित केले आहेत. तसंच दिशा सालियनच्या क्लोजर रिपोर्टवर सतीश सालियन यांनी देखील प्रश्न उपस्थित केल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. तर दिशाच्या वडिलांना हाताशी धरुन राजकारण सुरु असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. संजय राऊत म्हणाले की, त्या मुलीला डिप्रेशन होतं, हा त्यांचा कौटुंबिक आणि व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यावर आम्हाला राजकारण करायचं नाही. आता पाच वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करत आहेत, ते त्यांना लखलाभ होवो. पोस्टमॉर्टम रिपोर्ट कालच आलेला आहे. इतर काही गोष्टी समोर येत आहेत. आम्ही समर्थ आहोत, आदित्य ठाकरे समर्थ आहेत. उद्धव ठाकरे समर्थ आहेत. असा घाणेरडा विषयाचे राजकारण करून महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करू इच्छिता. बाळासाहेब ठाकरेंचं फोटो लावता आणि आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं विचार वाहक आहोत, असं म्हणतात, त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
दिशाच्या मृत्यू प्रकरणावरुन रामदास कदमांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी त्यांनी केलीय. दिशा सालियन मृत्यू प्रकरणारुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल करत मृत्यूच्या चौकशीची मागणी केलीय. दरम्यान कोर्टानं देखील याचिका स्वीकारली असून 2 एप्रिलला सुनावणी होणारय.. त्यामुळे या प्रकरणी कोर्ट कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचच लक्ष लागलंय...