Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेने जीवन संपवलं, पतीसह चौघांना पोलीसांकडून अटक

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देवळामध्ये सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केली आहे. 

सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेने जीवन संपवलं, पतीसह चौघांना पोलीसांकडून अटक

Nashik Crime News : लग्न होऊन फक्त सात महिने झाले असताना सासरच्या जाचाला कंटाळून एका नवविवाहितेने आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या देवळा नगरपंचायत हद्दीतील इंदिरानगर येथे घडली आहे. नवविवाहित महिलेला दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी वारंवार मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागल्याने नव विवाहितेने आत्महत्या केली असल्याची तक्रार नवविवाहितेच्या नातेवाईकांनी देवळा पोलिसात दिली आहे. या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे

देवळा पोलीस ठाण्यात शंकर वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अंबिका मयुर पवार (वय 19 रा. इंदिरा नगर, देवळा) हिच्यावर सासरच्या मंडळींकडून पैशासाठी वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. पती मयुर अंबादास पवार, सासू निर्मला अंबादास पवार, सासरे अंबादास पंडित पवार आणि नणंद पिंकी अंबादास पवार यांनी संगनमत करून अंबिकाला माहेरहून 20 हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता. माहेरहून पैसे न मिळाल्याने तिला वेळोवेळी सासरच्या लोकांकडून शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करण्यात येत होती. 

नवऱ्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल

अंबिकाला मारहाण करून 31 मार्च रोजी घरातून हाकलून दिले होते. त्यावेळी ती शेजारी राहणाऱ्या आपल्या आईकडे गेली. 1 एप्रिल रोजी सायंकाळी अंबिकाने आपल्या आईच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आई सखुबाई हिने पाहताच तात्काळ दरवाजा तोडून तिला खाली उतरवले व उपचारासाठी सटाणा येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने तिला नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, वाटेतच नवविवाहिता  मृत्यू झाला. देवळा ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर शवविच्छेदन करण्यात आले.

सध्या देवळा पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली असून अंबिकाच्या नवऱ्यासह चार जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 108, (3), 351(2), 85, 80, 115 (2), 352 या कलमांअंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबिकाच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Read More