Tahawwur Rana Shocking Revelation About 26/11 Mumbai Terror Attack: मुंबईवर 2008 साली झालेल्या 26/11 च्या हल्ल्याबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. हल्ल्यापूर्वी अरबी समुद्रातील लाटा उंच असल्याने हल्ल्याची तारीख एकदा पुढे ढकलण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय, लष्कर-ए-तोयबा आणि तहव्वूर राणा हे सर्वजण समुद्राच्या लाटा शांत होण्याची वाट पाहत होते, जेणेकरून हल्ला करता येईल. यासंदर्भातील माहिती काही दिवसांपूर्वीच प्रत्यार्पण करुन भारतात आणलेल्या तहव्वूर राणानेच चौकशीमध्ये दिली आहे.
डेव्हिड कोलमन हेडलीने तहव्वूर राणाला हल्ल्यापूर्वी एका भेटीदरम्यान समुद्रातील मोठ्या लाटांमुळे मुंबई हल्ल्याच्या प्लॅन पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं होत. समुद्राच्या लाटा शांत नाहीत त्यामुळे मुंबई हल्ला काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे, असं हेडलीने तहव्वूरला सांगितलं होतं. मुंबईतील ताजमहल पॅलेस हॉटेलवर दहशतवादी हल्ला होणार आहे असं मार्च 2008 मध्येच लष्कर-ए-तोयबाने हेडलीला सांगितले होते. विशेष म्हणजे, हेडलीने ही माहिती मे 2008 मध्ये शिकागोमध्ये राणाला भेटीदरम्यान दिली होती. मात्र, राणाने शिक्षेच्या भितीने अमेरिकेतील चौकशीदरम्यान त्याला 26/11 हल्ल्याची कोणतीही माहिती नव्हती असा खोटा जबाब नोंदवला.
हल्ल्यापूर्वी मुंबईतील कोणत्या ठिकाणांची पाहणी रेकी करण्यात आली आहे याची माहितीही हेडलीने राणाला दिली होती. तसेच, दहशतवाद्यांना ताजमहल हॉटेलजवळ उतरवण्याचे आदेश देण्यात आले होते, अशी माहितीही हेडलीने राणाला देली. हेडलीने मुंबई हार्बरमध्ये बोटीने रेकी केली होती आणि जीपीएस डिव्हाइसच्या वापराबाबतही राणाला माहिती दिलेली. या पाच दिवसांच्या संभाषणादरम्यान, हेडलीने राणाला भारतातील इतर शहरांच्या रेकीबाबतही माहिती दिली होती. हेडलीला आणखी काही शहरांमध्ये रेकी करण्याचे आदेश वरून देण्यात आले होते, असेही त्याने राणाला सांगितलं होतं.
26/11 हल्ल्याच्या कटातील प्रत्येक तपशील राणासोबत शेअर करण्यात आला होता. दहशतवादी लखवी, हाफिज सईद, मक्की आणि इतर दहशतवाद्यांना जेवढी माहिती होती, तेवढीच माहिती राणालाही होती, असे अमेरिकन तपास यंत्रणांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल त्यांनी भारताच्या राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) सोबत शेअर केला आहे.
एप्रिल 2008 च्या शेवटी हेडली सुमारे सहा आठवड्यांसाठी अमेरिकेत गेला होता. त्यानंतर मे 2008 च्या शेवटी हेडलीने शिकागोमध्ये राणाची भेट घेतली होती. सध्या एनआयए राणाची कसून चौकशी करत असून, 26/11 हल्ल्याशी संबंधित सर्व लपलेले रहस्य उघड करण्याचा प्रयत्न करत आहे.