Ravindra Chavan On BJP Leaders : मागील काही दिवसांपासून राज्यात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. सत्ताधारी पक्षातल्या अनेक नेत्यांच्या वक्तव्यांमुळे वादंग निर्माण झाला आहे. नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर हे कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे भाजप नेते. भाजपमधल्या या वादग्रस्त नेत्यांना नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तंबी दिली आहे.
प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होताच चव्हाण यांनी भाजपमधील बोलबच्चन नेत्यांना समज दिली. लोकप्रतिनिधींनी बोलताना जपून शब्द वापरले पाहिजेत.. टीआरपीच्या शर्यतीत नेत्यांनी अडकू नये अशी जाहीर तंबी रविंद्र चव्हाण यांनी दिली. काही दिवसांपूर्वी जाहीर सभेत बोलताना भाजप नेते गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली होती. शरद पवारांवर कायमच टोकाची टीका करणा-या पडळकरांनी पवार कुटुंबाबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेही कायमच वादाच्या केंद्रस्थानी असतात. नितेश राणेंच्या अनेक वक्तव्यांनी आजवर वाद झालेले आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर भाजपचीही अनेकदा अडचण झाल्याचं चित्र आहे.
भाजपमधल्या या सर्वच बोलबच्चन नेत्यांना आता प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सज्जड इशारा दिलाय. अशा वाचाळवीर नेत्यांमुळे भाजपची अडचण झाल्याचीच कबुली अप्रत्यक्षपणे रविंद्र चव्हाण यांनी दिलीय. त्यामुळे आता थेट प्रदेशाध्यक्षांनीच कान टोचल्यानंतर भाजपमधील वाचळवीरांना चाप बसणार का, याकडे लक्ष लागलंय.
नेत्यांनी टीआरपीच्या स्पर्धेत उतरू नये. आपण महायुती म्हणून निवडणूक लढणार आहोत. कोण मोठा कोण छोटा ? आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय
हे तिघे रक्ताच्या भावाप्रमाणे काम करतायत. हे तिन्ही भावंडं महाराष्ट्राचे प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळत असतील तर राजकीय गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे असं रविंद्र चव्हाण म्हणाले. कुठलंही शीतयुद्ध नाही. आमचे चांगले संबंध आहेत. काही मोजके प्रसंग सोडले तर सगळं व्यवस्थित आहे. गेल्यावेळी महापालिकेत आम्ही वेगळे लढलो आणि पुन्हा एक झालो. 2017 मध्ये मुंबईत सेनेला आम्ही महापौर पद दिलं होतं. पुन्हा असं होईल का सांगता येत नाही. Boss is always right हे आमची पद्धत. देवेंद्रजी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. आम्ही संघटना वाढीसाठी प्रयत्न करतोय.