उर्वशी खोना, झी 24 तास नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोणताही हिंदू दहशतवादी होऊ शकत नाही असं वक्तव्य केलं होतं.. विरोधकांनी मतांसाठी दहशतवादाला रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही अमित शाहांनी केला. आणि त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दहशतवादाच्या धर्मावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
संसंदेच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवादासंदर्भात एक मोठं विधान केलं आहे. कोणताही हिंदू दहशतवादी होऊ शकत नाही असं वक्तव्य अमित शाह यांनी राज्यसभेत केलं आहे. काँग्रेसनं मतांसाठी हिंदुत्ववादी संघटनांना लक्ष्य केलं. तसंच राजकीय फायद्यासाठी निष्पाप लोकांना तुरुंगात टाकल्याचा आरोपही यावेळी अमित शाहांनी केला आहे. मुंबईतील 26/11 च्या च्या हल्ल्यासाठी काहींनी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरलं होतं असं म्हणत शाहांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधला..
तर कोणत्याही धर्माच्या आधारावर दहशतवाद असू शकत नाही. काही लोक धर्माचा वापर द्वेषासाठी करतात आणि तेच दहशतवादाला जन्म देतात असं म्हणत काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान दहशतवाद्याला कोणतीही जात किंवा धर्म नसतो अशी प्रतिक्रीया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या वक्तव्याची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील निकाला दरम्यानही चर्चा झाली.
पार्लमेंटमध्ये गृहमंत्री म्हणाले होते हिंदू आतंकवादी होऊ शकत नाही. ते या कोर्टाने आज सिद्ध करून दाखवलं आहे. यावर कोर्टाने आरोपींच्या वकीलांना उत्तर दिलं आहे. हे कोर्ट आहे पार्लमेंट नाही. इथे मेरिटवर निकाल येतो
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरचं सिंदूर ऑपरेशनवरून संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. आता दहशतवादाच्या धर्म आणि रंगावरून अमित शाहांनी विरोधकांना छेडल्यानंतर यावरूनही जोरदार राजकीय रणकंदन सुरू झालं आगहे.