Ola Showroom In Maharashtra: महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या एक महत्त्वाच्या निर्णयामुळे राज्यातील ओला कंपनीच्या 385 शोरूमला टाळं लागलं आहे. राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या भरारी पथकांनी केलेल्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी सर्व्हिसेस (ओला) कंपनीच्या शोरूम तपासणीमध्ये 432 शोरूमपैकी केवळ 47 शोरूमकडे विक्री परवाना असल्याचे आढळले. त्यामुळे ओलाचे उर्वरित 385 शोरूम बंद करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
परिवहन विभागाच्या नियमानुसार, विना नोंदणी वाहने शोरूममध्ये विक्रीसाठी ठेवण्यासाठी ट्रेड सर्टिफिकेट घेणे गरजेचे आहे. मात्र, ओला शोरूमकडे हे प्रमाणपत्र नसल्याने राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे. परिवहन आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्त विजय तिराणकर यांनी याबाबत सरकारला कारवाईची माहिती दिली. ओलाच्या शोरूमकडे ट्रेड सर्टिफिकेट नसल्याची तक्रार प्रीतपाल सिंग यांनी केली होती. त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये हे प्रमाणपत्र नसलेले शोरूम बंद करण्यात आले आहेत. कंपनीने हे प्रमाणपत्र सादर केल्यावर शोरूम सुरू केली जाऊ शकतात, असे परिवहन आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
राज्यात 2021 पासून ओलाच्या 1 लाख 31 हजार 374 दुचाकींची विक्री झाली आहे. 2025 मध्ये 13 हजार 298 दुचाकींची विक्री झाली. तर मागील एका वर्षात 2 लाख 12 हजार ई-बाईक्सची विक्री ओलाने केली आहे. देशातील आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर देशभरात ओलाच्या 9 लाख 5 हजार 815 दुचाकी विकेल्या गेल्या. मागील वर्षभरात ओलाने 2 लाख 44 हजारांहून अधिक दुचाकी विकल्यात. त्यातील 12 टक्के विक्री महाराष्ट्रात झाली आहे. राज्यात एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षात दोन लाख 12 हजार इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली.
जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत ओला इलेक्ट्रिकचा महसूल 49.6 टक्क्यांनी घसरून 828 कोटींवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 1644 कोटींचा महसूल मिळाला होता. मात्र, गेल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात 35 टक्के वाढ झाली आहे. कंपनीला या तिमाहीत 428 कोटी रुपयांचा तोटा झाला गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये 33.3 टक्के वाढ झाली आहे. बाजारात उतरलेल्या अनेक स्पर्धक कंपन्या, उत्पादनांसंदर्भातील तक्रारींबरोबरच इतरही अनेक कारणांमुळे कंपनीला फटका बसल्याची चर्चा उद्योग जगतामध्ये आहे.