Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - पणनमंत्री

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. 

निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - पणनमंत्री

मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. दरम्यान, कांदा निर्यायतबंदी संदर्भात राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यासंदर्भात केंद्राला तातडीने पत्र पाठविण्यात येईल तसेच पाठपुरावा करून निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्याची मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकारला कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी विनंती करण्यात येईल असेही पणनमंत्री पाटील यांनी सांगितले. 

तर दुसरीकडे देशातील एकूण कांदा उत्पादनाचा विचार केला तर  महाराष्ट्रात ७५टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते. निर्यातीमध्येसुद्धा जवळपास ८० टक्के कांदा हा राज्यातील शेतकऱ्यांचा असतो या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, पणनमंत्री पाटील म्हणाले.

खासदार शरद पवार यांनीसुद्धा काल केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन कांदा निर्यातबंदीसंदर्भात चर्चा  केली. तसेच राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे. लिलाव थांबले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून  केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असेही  पाटील यांनी सांगितले.

Read More