Leh Ladakh Khanaval helping Maharashtra Tourists : (India Pakistan War) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असणाऱ्या संघर्षाच्या धर्तीवर सध्या देशातील अनेक विमानतळांवरील सेवा बंद करण्यात आल्या आहेत. लेहच्या विमानतळाचाही यात समावेश असून, सध्याच्या घडीला तिथंसुद्धा अनेक पर्यटक प्रवास सेवांअभावी अडकून पडल्याचं पाहायला मिळत आहे.
भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढल्यानंतर प्रभावित झालेल्या सेवा पाहता या भागांमधील अनेक हॉटेल असोसिएशनच्या वतीनं पर्यटक ज्या हॉटेलांमध्ये वास्तव्यास आहेत त्यांच्यासाठी वाढीव मुक्कामाची व्यवस्था करून दिली. तर, महाराष्ट्रातून तिथं पर्यटनासाठी पोहोचलेल्या आणि युद्धजन्य परिस्थितीमुळं अडकलेल्या पर्यटकांना मदतीचा हात आणि आधार देण्यासाठी एक मराठमोळी जोडी पुढे सरसावली आहे.
साधारण दोन अडीच वर्षांपासून समुद्र सपाटीपासून 11562 फूट इतक्या उंचीवर असणाऱ्या लेहमध्ये अतिशय मोक्याच्या ठिकाणी ग्रीष्मा आणि कौस्तुभ ही जोडी त्यांची 'खानावळ' चालवत आहे. आपल्या घरापासून दूर, प्रवासात असताना थेट लेह लडाखच्या प्रवासावर असणाऱ्यांना महाराष्ट्राची चव चाखण्याची संधी हेत खानावळ हे हॉटेल त्यांनी तिथं सुरू केलं आणि आता त्यांचं हेच हॉटेल तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना घरापासून दूर असतानाही आपलेपणाची जाणीव आणि आधार देताना दिसत आहे.
नुकतंच खानावळच्या इन्स्टाग्राम पेजवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, तिथं अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकांसाठी या जोडीनं मदतीचा हात पुढे केला आहे. 'लेहचे एअरपोर्ट येते काही दिवस बंद आहे. घाबरून जाऊ नका.
आपल्यापैकी कोणीही लडाखमध्ये अडकले असल्यास किंवा अडचणीत असल्यास आम्ही तुमच्यासाठी सदैव उपलब्ध आहोत.' असं कॅप्शन देत त्यांनी कोणत्याही प्रसंगी मदत हवी झाल्यास संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांकही जारी केले आहेत, ते पुढीलप्रमाणे ग्रीष्मा 9970657647 /कौस्तुभ 8655539525.
खानावळ लेह मार्केट पत्ता - पहिला मजला, एअरटेल ऑफिसच्या वर, लेह मेन मार्केट, लेह. UT Ladakh.
सध्या सीमाभागात वाढता तणाव पाहता तिथं अडकलेल्या अनेक पर्यटकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र सैन्यदल आणि स्थानिक पोलीस यंत्रणांनी या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था तैनात ठेवत शक्य त्या सर्व परिंनी इथं पर्यकांना सुरक्षिततेची हमी दिली जात आहे. याशिवाय भीतीपोटी काही पर्यटकांनी हवाई वाहतूक बंद असल्यानं रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडल्याचं पाहून असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा त्यासंदर्भातील सविस्तर माहिती मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याशी संपर्क साधा, सैन्यदलाला सहकार्य करा असं आवाहन खानावळच्या ग्रीष्मा आणि कौस्तुभनं केलं आहे.