Dombivli Press Conference: माझे व़डील संजय लेले यांच्या डोक्यात गोळी घातली. गोळ्या घातल्या तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता. माझ्या हाताला काहीतरी जाणवलं. नंतर उठून पाहिलं तर वडिलांचं डोकं रक्ताने माखलेलं होतं हे सांगताना त्यांचा मुलगा हर्षल लेले याला अश्रू अनावर झाले होते. पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या डोंबिवलीमधील संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांच्या कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषद घेत नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती दिली.
संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले यानेही सगळा घटनाक्रम उलगडून सांगितला. '21 तारखेला आम्ही रात्री तिथे पोहोचलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तीन तास प्रवास करुन तिथे पोहोचलो होतो. आम्ही तिथे असताना गोळीबाराचा आवाज ऐकला. फार दुरून आवाज आल्याने आम्ही दुर्लक्ष केलं. नंतर तो आवाज जवळ येत होता. स्थानिकांनी आम्हाला गोळी लागू नये यासाठी खाली वाकण्यास सांगितलं," अशी माहिती त्याने दिली.
पुढे त्याने सांगितलं की, "दहशतवाद्यांनी हिंदू मुस्लिमांना वेगळं होण्यास सांगितलं. अतुल मोने यांनी दोघींना (पत्नी, मुलगी) मिठी मारुन, यांना सोडून द्या सांगितलं. त्यावर त्याने बाजूला व्हा नाही तर सगळ्यांना मारु असं म्हटलं. यानंतर त्याने पोटात गोळी घातली".
"माझे व़डील संजय यांच्या डोक्यावर गोळी घातली. गोळ्या घातल्या तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता. माझ्या हाताला काहीतरी जाणवलं. नंतर उठून पाहिलं तर वडिलांचं डोकं रक्ताने माखलेलं होत. जेव्हा मी हे सर्व पाहिलं तेव्हा स्थानिकांनी जीव वाचवून निघून जा असं सांगितलं," असा खुलासा त्यांनी केला.
"तिथे घोड्याने जायला 3 तास लागतात. तिथे नेणाऱ्यांनी जमेल तसा घोडा दिला होता. सगळे खाली उतरत होते. आम्ही आईला काही वेळ उचललं होतं. घोडेवाल्याने नंतर आईला पाठीवर उचलून घेतलं. मी आणि माझा भाऊ 4 तास चालत होते. आईला आधीच रुग्णालयात चेकअपसाठी नेलं होतं. 2 ते 2.30 च्या सुमारास गोळीबार झाला होता. आम्ही 7 च्या आसपास खाली पोहोचलो. मला तिघांचा मृत्यू झाल्याचं समजलं होतं. पण अधिकाऱ्यांनी कोणाला सांगू नका अंसं सांगितलं होतं. माझ्या काकांनी आय़पीएस अधिकाऱ्याशी बोलून त्यांच्या मित्राच्या घरी राहण्याची व्यवस्था केली होती. मी त्यांचा आभारी आहे," असंही त्याने सांगितलं.
अनुष्का मोने यांनी यावेळी सांगितलं की, "हिंदू कोण आहे विचारलं असता जिजूंनी हात वर केला, तर त्यांना गोळ्या घातल्या. आमच्यासमोर आमच्या तिघांना गोळ्या घालण्यात आल्या. हे सर्वजण आमच्या घरातील कर्ते पुरुषच होते. अशा बऱ्याच जणांना त्यांनी मारलं आहे. दहशतवादी गेल्यानंतर आम्ही त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला काही करता आलं नाही. अनेकांनी आम्हाला तुम्ही तुमचा जीव वाचवून जा असं सांगितलं".
"तुम्ही लोकांनी येथे दहशत निर्माण करुन ठेवली आहे असं दहशतवादी बोलत होते. असं बोलताना ते फायरिंग करत होते. पर्यटक फक्त फिरायला येतात त्यांचा काय गुन्हा आहे? सरकारने यावर कारवाई करत आम्हाला न्याय मिळवून द्यावा," अशी मागणीही त्यांनी केली आहे.