Cabinet Meeting CM Fadnavis Big Announce: काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या मयत पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. यापैकी तीन पर्यटक हे डोंबिवलीमधील असून एकजण पनवेलमधील आहे. त्याप्रमाणे पुण्यातील दोन पर्यटकांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या मयत पर्यटकांच्या नातेवाईकांना दिलासा देणारा मोठा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या 6 मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत केली जाणार आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहलगाममधील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्रातील 6 मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याशिवाय या कुटुंबांच्या शिक्षण, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.
जगदाळे कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांनी विशेषाधिकार वापरत त्यांना आता शासकीय नोकरी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला आहे.
डोंबिवलीमधील तिघांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी हे तिघेही पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. हे तिघेही एकमेकांचे मावस भाऊ होते. मोने, लेले आणि जोशी कुटुंबातील 9 जण काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. अतुल मोनेंसही त्यांची पत्नी अनुष्का मोने (35) आणि मुलगी रुचा मोने (18), संजय लेले (50) त्यांची पत्नी कविता लेले (46) आणि मुलगा हर्षल लेले (20) तर हेमंत जोशी यांची पत्नी मोनिका जोशी (41) आणि मुलगा ध्रुव जोशी (16) असे 9 जण काश्मीरला गेले होते.
याचप्रमाणे पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचाही या दुर्देवी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. संतोष जगदाळेंच्या मुलीला नोकरी देण्याची मागणी केली जात होती. ही मागणी आधीच मुख्यमंत्र्यांनी मान्य केली होती आजच्या बैठकीमध्ये सरकारी नोकरी देण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला आहे.
पनवेलचे दिलीप दिसले यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाले होते. दिलीप दिसले हे त्यांच्या पत्नीसोबत पहलगाम येथे पर्यटनासाठी गेले होते. दहशतवादी हल्ल्यात दिलीप दिसलेंना गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.