सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : (Pandharpur News) काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या आषाढी एकादशीच्या मंगलपर्वाच्या निमित्तानं लाखो भाविकांनी (shri vitthal rukmini mandir) श्री विठ्ठलाचरणी आपली सेवा अर्पण केली. असंख्य वारकऱ्यांनी मायबाप विठ्ठलाला डोळा भरून पाहिलं. आषाढीची ही गर्दी सध्या पंढरपुरातून ओसरली असली तरीही दर दिवशी इथं येणाऱ्या सामान्य भाविकांची संख्यासुद्धा मोठी आहे. याच गर्दीचा आणि भाविकांचा मंदिरात येऊन विठ्ठल आणि रुक्मिमीमातेच्या पुजेचा आग्रह पाहता त्यासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीनं सुरू करण्यात आली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात पार पडणाऱ्या नित्यपुजा, पाद्यपुजा, तुळशी अर्चन पूजा आणि महानैवेद्य या सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. त्यासाठी आता 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीदरम्यान होणाऱ्या पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात 28 जुलै 2025 पासून सकाळी साधारण 11 वाजण्याच्या सुमारास सुरू होणार आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
पंढरपुरातील या पुजेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना https://www.vitthalrukminimandir.org अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे, जिथं त्यांना यासंदर्भातील सविस्कर माहिती, पुजेचं स्वरुप आणि शुल्क यासंदर्भातील माहिती मिळेल. वर नमूद करण्यात आलेल्या तारखांदरम्यान सण, उत्सव आणि गर्दीचे दिवस वगळता इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपुजेसह पाद्यपुजा, अशा पुजांसाठी ही नोंदणी केली जाईल.
पुजेसाठी ऑनलाइन नोंदणी करत असतेवेळी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत केली जाईल. दरम्यान भाविकांना अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या वतीनं 02186 -299299 हा दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आला आहे. इतकंच नव्हे, तर पुजेसंदर्भातील बुकिंग मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळाशिवाय इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीस संपर्क करू नये असंही आवाहन मंदिर समितीकडून करकण्यात आलं आहे.
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे 25,000, 11,000 रुपये, पाद्यपूजेसाठी 5,000 रुपये, तुळशी अर्चन पूजेसाठी 2100 रुपे आणि महानैवेद्य सहभाग योजनेसाठी 7,000 रुपये इतकं देणगी मुल्य आकारण्यात येत आहे.