Parabhani Water Issue: परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील उमला नाईक तांड्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत असून गावातील लोकांनी पाणी चोरी जाऊ नये म्हणून कुलूप बंद केलय, पाणीच नसल्याने लहानग्यांना बाजेवर आंघोळ घालून टोपल्यात साठवलेल्या पाण्याने कपडे धुण्याची वेळ आलीये.
बंद पडलेला हापसा,गाडीवर बांधलेली टाकी,घरासमोर पाणी साठवण्यासाठी कुलूप बंद असलेले शौचालय, असे चित्र सध्या परभणीच्या गंगाखेडमध्ये पाहायला मिळतं. लहान मोठ्यांची हपश्यावर झालेली गर्दी पाहून गावात पाण्याचे किती दुर्भिष्य आहे? ते तुमच्या लक्षात येईल.पाणी आणण्यासाठी आज्जीनाही हंडा घेऊन घराबाहेर पडावं लागतंय.
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील उमला नाईक तांड्यातील, उमला नाईक तांड्यात साडेपाचशे लोकवस्ती आहे. उमला नाईक तांडा ही पडेगाव ग्रामपंचायतील गट ग्रामपंचायत आहे. पाणी टंचाई ही तांड्याच्या पाचवीलाच पुजलेली आहे. गावात लाखो रुपये खर्चून नळ योजना दोन वर्षांपूर्वी गावात आणण्यात आली,पण नळाला काय थेंब भर पाणी आले,त्यामुळे येथील लोकांना दोन किमी अंतरावरून पायपीट करीत हंडाभर पाणी आणावे लागतंय. येथील बायका पाण्याची बचत व्हावी म्हणून बाजेखाली टोपलं ठेऊन मुलांना बाजेवर अंघोळ घालतात. बाजेखाली टोपल्यात साचलेल्या पाण्यात मुलांना अंघोळ घालावी लागतेय.
गावात पाणीच नसल्याने लेकराबाळांची तहान भागविण्यासाठी गावकऱ्यांना 2 किमी दूर असलेल्या हपश्यावर जाऊन पाणी भरावे लागतेय. येथेच बायका धुणी धुत असतात. गुराढोरांना रांगेत उभं राहून पाणी प्यावे लागते. पाणीच नसल्याने लोकांनी शौचालय कुलूप बंद केली आहेत. एवढंच नाही तर गावातील लोकांनी पाण्याची चोरी होऊ नये म्हणून अक्षरश: पाण्याच्या टाकीला कुलूप लावून टाकलंय.
गावात 84 लाख रुपये खर्चून नळ योजना टाकली असल्याचं गावकरी सांगतायत. जर 84 लाख रुपये खर्चून ही गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असेल तर या कामात झालेला भ्रष्टाचार समोर आलाच पाहिजे, अशी मागणी गावकरी करतायत. उमला नाईक तांडा वाशीयांची पाण्यासाठी होणारी होरपळ थांबणे आणि ग्रामस्थानां नळातून पाणी मिळणे आवश्यक आहे.