Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'फी' परत मागितल्याने...; अजित पवारांच्या नेत्याकडून झालेल्या बेदम मारहाणीत पालकाचा मृत्यू

परभणीच्या झिरो फाटा परिसरात असणाऱ्या स्कूलमध्ये धक्कादायक घटना घडलीय. मुलीचा टीसी आणि फी परत मागण्यासाठी आलेल्या पालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत पालकाचा मृत्यू झालाय. 

'फी' परत मागितल्याने...; अजित पवारांच्या नेत्याकडून झालेल्या बेदम मारहाणीत पालकाचा मृत्यू

Parbhani Crime News: परभणीच्या झिरो फाटा परिसरात असणाऱ्या हायटेक रेसिडेनशियल स्कूलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. स्कूलमध्ये आपली मुलगी निवासी वसतिगृहात राहत नसल्याने तिचा टीसी आणि स्कूलमध्ये भरण्यात आलेली फी परत मागण्यासाठी आलेल्या पालकाला स्कूलच्या संस्थाचालक दाम्पत्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

या मारहाणीमध्ये पालकाचा मृत्यू झाला आहे. परभणी तालुक्यातील उखळद येथील 42 वर्षीय जगन्नाथ हेंडगे यांची मुलगी पल्लवी ही झिरो फाटा येथील प्रभाकर चव्हाण यांच्या हायटेक रेसिडेनशियल स्कूलमध्ये निवासी होती. पण ती लहान असल्याने तिला आई वडिलांना सोडून या हायटेक रेसिडेनशियल स्कूलच्या निवासी वसतिगृहात करमत नव्हते. त्यामुळे पल्लवीला तिचे वडील जगन्नाथराव हे घरी घेऊन गेले होते. 

स्कूल संस्थाचालक आणि पत्नीवर गुन्हा दाखल

गुरुवारी जगन्नाथ हेंडगे परत शाळेत येऊन आपल्या मुलीचा टीसी आणि स्कूलमध्ये भरलेली फी मागण्यासाठी शाळा व्यवस्थापणाकडे आले होते. त्यावेळी अजित पवार गटाचे नेते तथा शाळेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नी हिंगोली जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण या दोघांनी पालक जगन्नाथ हेंगडे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये पालक जगन्नाथ हेंगडे यांचा मृत्यू झाला. या मारहाण प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात मुंजाजी हेंगडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर स्कूल परिसरात तणावपूर्ण परिस्थिती

परभणीमधील हायटेक रेसिडेनशियल स्कूलमधील या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निवासी गुरुकुल शिक्षण पद्धती निर्माण झाल्या असून अनेक शाळा पालकांची फीसाठी पिळवणूक करत असल्याचा घटना नेहमीच घडत असतात. पण ही गुरुवारची घटना शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी आहे. या घटनेनंतर स्कूलच्या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्णा पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. त्याचबरोबर स्कूल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Read More