Health News: घरात लहान मुलं असतील तर डोळ्यात तेल टाकून त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागते. मुलं कधी काय करतील, कधी काय गिळतील याचा अंदाज लावता येत नाही. असाच एक प्रकार समोर आलाय. ज्यामध्ये एका लहान मुलाने धातूचा तुकडा गिळला. हा धातूचा तुकडा थेट अन्ननलिकेत जाऊन अडकला. पुढे काय झालं? सविस्तर जाणून घेऊया.
मुंबईत राहणाऱ्या एका 10 वर्षाच्या बालकाने खेळता खेळता हँडबॅगच्या चेनचा स्टॉपर गिळला. हा तीक्ष्ण धातूचा तुकडा थेट त्याच्या अन्ननलिकेत जाऊन अडकला. बाळाने ती वस्तू कधी आणि कशी गिळली? याबाबत पालकांना काहीच माहिती नव्हती. अचानक बाळाला खोकला सुरु झाला आणि तो चिडचिड करु लागला. हे सर्व नॉर्मल असेल असंच सुरुवातीला पालकांना वाटत होतं. पण खोकला काही जाईल. 2 आठवड्यांपासून हा प्रकार सुरु होता. अनेक डॉक्टर झाले पण योग्य ते उपचार होत नव्हते.
बाळाचा एक्स रे काढण्यात आल्यानंतर त्याच्या अन्ननलिकेमध्ये धातूची वस्तू अडकल्याचे आढळून आले. यानंतर पालक चांगलेच घाबरले आणि त्यांनी थेट वाडिया रुग्णालय गाठले. वाडिया रुग्णालयात बाळाची तपासणी करण्यात आली. हृदयाच्या रक्तवाहिन्यांजवळील अन्ननलिकेच्या मध्यभागी धातूची टोकदार वस्तू अडकल्याचे या तपासणीतून निष्पन्न झाले. या कारणामुळे बाळाच्या श्वासनलिकेवर दाब पडत होता.
बालरोग ईएनटी तज्ज्ञ डॉ. बालगोपाल कुरूप यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने बाळावर उपचार केले. सुरुवातीला बाळाला सामान्य भूल देऊन एसोफॅगोस्कोपी करण्यात आली. तासभर चाललेल्या या शस्त्रक्रियेत श्वास नलिकेमध्ये दाब दिसून आला. एसोफॅगोस्कोपीमध्ये अन्ननलिकेच्या मध्यभागी एक तीक्ष्ण धार असलेल्या धातूचा तुकडा डॉक्टरांना आढळला. या कारणामुळे तेथे व्रण आणि सूज आली होती.
बालरोग भूलतज्ज्ञ डॉक्टरांनी प्रसंगावधान राखले. बाळाला भूल देण्यात आली आणि त्यानंतर ईएनटी डॉक्टरांच्या तुकडीने अन्ननलिकेच्या डाव्या बाजूला अडकलेली वस्तू यशस्वीपणे बाहेर काढली. शस्त्रक्रियेनंतर पुन्हा बाळाचा एक्स-रे काढण्यात आला. वस्तू किंवा त्याचा भाग तिथे राहिला नाही ना, याची खात्री करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानतर बाळाला लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. आता बाळ सुखरुप असून त्याच्या आईवडिलांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.