Plea In Supreme Court Against Raj Thackeray : महाराष्ट्रातील एका बड्या पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात तशी याचिका दाखल करण्यात आली. हा मोठा पक्ष म्हणजे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नव निर्माण सेना आहे. परप्रांतीयांविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्या विरोधात ही याचिका दाखल झाली आहे.
गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंनी मराठी भाषेसंदर्भात एका नव्या मोहीमेची घोषणा केली होती. बँक आणि आस्थापनात मराठी भाषेचा वापर केला जातो का? हे तपासण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले होते. उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. परप्रांतीयांविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांविरोधात सतत भडकावू व्यक्तव्य तसेच त्यांना बळजबरी आणि धमकावल्याचा आरोप देखील याचिकेत करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांच्या भाषणाचा देखील याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. राज ठाकरे यांना यापुढे चितावणीकर वक्तव्य करण्यापासून थांबवण्याची मागणी देखील याचिकेतून करण्यात आली आहे.
दरम्यान, मनसेच्या मराठी सक्तीच्या आंदोलनावरुन गुणरत्न सदावर्ते विरुद्ध राज ठाकरे असाही संघर्ष निर्माण झाला आहे. राज ठाकरे मराठीची सक्ती करुन कायदा हातात घेत असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केलाय. मनसेकडून कुठलीही तोडफोड केली जाऊ नये किंवा कुणालाही मारहाण होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सदावर्तेंनी सांगितलंय. झी 24 तासच्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय. राज ठाकरेंच्या आंदोलनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं गुणरत्न सदावर्तेंनी म्हणाले होते. राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केलीय. यासंदर्भात आपण पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. शिवाय त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. राज ठाकरे मराठी तरुणांना चिथावणी देत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.