Narendra Modi call to Ujjwal Nikam: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, मुंबई हल्ला प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम, शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्टर आणि इतिहासकार मीनाक्षी जैन यांना नामांकित केलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी रात्री उशिरा जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राष्ट्रपतींनी या चौघांनाही राज्यसभेवर नामांकित केलं आहे.
राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून निवड झाल्यानंतर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केलं आहे. मोदींनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन, "उज्ज्वल निकम यांची कायदेशीर क्षेत्राप्रती आणि आपल्या संविधानाप्रती असलेली निष्ठा अनुकरणीय आहे. ते केवळ एक यशस्वी वकील राहिले नाहीत तर महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये न्याय मिळवण्यातही ते आघाडीवर राहिले आहेत. त्यांच्या संपूर्ण कायदेशीर कारकिर्दीत, त्यांनी नेहमीच संवैधानिक मूल्ये बळकट करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना नेहमीच सन्मानाने वागवले जावे यासाठी काम केले आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेवर नामांकित केले आहे हे आनंददायी आहे. त्यांच्या संसदीय कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा," असं म्हणत निकम यांचं अभिनंदन केलं आहे.
राज्यसभेसाठी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरुन उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद साधला. यासंदर्भात माहिती देताना उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की, "मला नामंकित केल्याबद्दल मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आभारी आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माझी मोदीशी भेट झाली होती. त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला होता. काल मोदींनी मला माझी निवड झाल्याची माहिती देण्यासाठी फोन केला होता".
उज्ज्वल निकम यांनी पुढे सांगितलं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला हिंदीत बोलायचं आहे की मराठी अशी विचारणा केली. त्यावर आम्ही दोघेही हसू लागलो होतो. यानंतर पंतप्रधान मोदींनी माझ्याशी मराठीत संवाद साधला आणि राष्ट्रपतींना माझ्यावर जबाबदारी सोपवायची आहे असं सांगितलं. यानंतर त्यांनी मला राष्ट्रपतींच्या निर्णयाची माहिती दिली. मी तात्काळ होकार दिला आणि पक्षाच्या नेतृत्वाचे आभार मानले".
उज्ज्वल निकम हे एक प्रसिद्ध वकील आहेत आणि त्यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम केले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांना मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून उभे केले होते. पण काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी त्यांना निवडणुकीत पराभूत केले.
महाराष्ट्रातील जळगाव येथे जन्मलेले उज्ज्वल निकम हे देशातील एक प्रसिद्ध वकील आहेत आणि त्यांनी हाय प्रोफाइल केसेस लढवून स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात पकडण्यात आलेल्यादहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्यात सरकारी वकील म्हणून निकम यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय, 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातही ते सरकारी वकील होते.
प्रसिद्ध बॉलिवूड संगीत निर्माता गुलशन कुमार हत्या प्रकरण आणि प्रमोद महाजन हत्या प्रकरणातील सरकारी वकील म्हणून काम केलेले निकम हे देशातील सर्वात प्रतिष्ठित वकिलांमध्ये गणले जातात. 2016 मध्ये, उज्ज्वल निकम यांना कायदेशीर क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री प्रदान केला.