Mumbai MHADA Redevelopment Project : जोगेश्वरी (पूर्व) येथील पूनमनगर मेघवाडी या पंतप्रधान अनुदान प्रकल्पातील वसाहतीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. 'म्हाडा' मार्फत वसाहतीच्या पुनर्विकासासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत रहिवाशांना 180 फुटांच्या बदल्यात 450 चौरस फुटांचे घर मिळणार आहे. साडेतीन वर्षाच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा 'म्हाडा'चा संकल्प आहे.
सुमारे 27,626 चौरस मीटरवर वसलेल्या पूनमनगर पीएमजीपी वसाहतींचे पुनर्वसन कंत्राटदाराची नेमणूक करून म्हाडाच्या माध्यमातून होत आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 984 कुटुंबीयांचे अत्याधुनिक सदनिकेमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. 1990-92 दरम्यान पंतप्रधान अनुदान प्रकल्पाअंतर्गत उभारलेल्या वसाहतीत तळमजला अधिक 4 मजले असलेल्या एकूण 17 इमारती आहेत. वसाहतीमध्ये 942 निवासी व 42 अनिवासी अशा एकूण 984 कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. सुमारे तीन दशकांपूर्वी उभारलेल्या या इमारती आता अत्यंत जीर्णावस्थेत आहेत.
पुनर्विकासासाठी 2010 मध्ये बिल्डरची नेमणूक करण्यात आली होती. परंतु बिल्डरकडून बराच काळ हा पुनर्विकास प्रकल्प रखडला होता. त्यामुळे इमारती जीर्ण व धोकादायक झाल्या होत्या. यावर प्रकल्प म्हाडामार्फत राबविण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार 15 डिसेंबर 2020 मध्ये शासनाने बिल्डरची नेमणूक रद्द केली. प्रकल्प म्हाडामार्फतच राबविण्याचे निर्देश दिले.
वरळी आणि नायगाव येथील बीडीडी चाळींच्या जागेवर उंच व आलिशान टॉवर्स उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून सप्टेंबरपर्यंत सुमारे 2300 रहिवाशांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या मिळणार आहेत. वरळी बीडीडीतील 556 सदनिकांचे वाटप येत्या दोन आठवड्यांत तर 1419 सदनिकांचे हस्तांतरण येत्या सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. नायगाव बीडीडीतील 342 रहिवाशांना नव्या सदनिका येत्या डिसेंबर महिन्यात सुपूर्द केल्या जाणार आहेत. वरळी बीडीडी चाळीतील 9869 पुनर्वसन सदनिकांपैकी 3888 सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून पुढील दोन आठवड्यांत 556 सदनिकांचे हस्तांतरण होणार आहे. तसेच 1419 सदनिकांचे सप्टेंबर 2025 मध्ये हस्तांतरण करण्यात येणार आहे. तर 1642 सदनिकांचे हस्तांतरण ऑगस्ट 2027 पर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नायगाव बीडीडी चाळीतील 3344 सदनिकांपैकी 1938 सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून सप्टेंबर 2025 मध्ये 864 सदनिकांचे हस्तांतरण करण्याचे नियोजन असल्याचे या वेळी सांगण्यात आले. ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या प्रकल्पातील 2560 पुनर्वसन सदनिकांपैकी 1241 सदनिकांचे काम प्रगतीपथावर आहे. यापैकी 342 सदनिकांचे हस्तांतरण डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात येणार आहे.