Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मुंबई बंद!.... शेतकऱ्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर काय म्हणाले बच्चू कडू?

Bacchu Kadu Meet Raj Thackeray : प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली... 

मुंबई बंद!.... शेतकऱ्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर काय म्हणाले बच्चू कडू?

Bacchu Kadu Meet Raj Thackeray : शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांपुढं उभी असणारी आव्हानं, दिव्यांगांचे प्रश्न आणि अशा कैक मुद्द्यांवर चर्चा करत मराठवाजड्यातील आंदोलनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत शेतकऱ्यांना संबोधित करावं अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नुकतीच प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 

ठाकरेंच्या मुंबईतील निवासस्थानी कडू यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील माध्यमांशी संवाद साधत जाहीर केला. आपण मोठं होणं गरजेचं नाही, तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत आणि हे आंदोलन फक्त बच्चू कडूंपुरताच मर्यादित राहायला नको असं राज ठाकरे यांच्यासोबतच्या चर्चेत बोलणं झाल्याचं कडूंनी सांगितलं. 'मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं म्हणतात की दुष्काळ पडला, तरच कर्जमाफीचा विचार करु, तर दुष्काळ पडायची वाटच आता शेतकऱ्यांनी पाहावी असं चित्र उभं करणं ही शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी बाब आहे', असंही ते म्हणाले. 

शेतमाल आणि शेतकरी आत्महत्या याबाबत काय म्हणाले बच्चू कडू?

'माझ्याकडे येणारे मॅसेज पाहिले तर, शेतमालाला अपेक्षित दर न मिळणं ही बाब दुष्काळापेक्षाही अधिक भीषण आहे आणि त्यामुळं अनेक शेतकरी जीव गमावत आहेत. हे फडणवीसांच्या लक्षात यायला पाहिजे', असं बच्चू कडू म्हणाले. मराठवाड्यातील यात्रेसाठी राज ठाकरे यांनी उपस्थित राहत शेतकऱ्यांना संबोधित करावं अशी विनंतीसुद्धा आपण केल्याचं त्यांनी सांगितलं. 

शेतकऱ्यांसाठी मुंबई बंद होणार? 

मुंबईत आजवर झालेल्या आंदोलनांचा संदर्भ देत, 'आजवर अनेक मागण्यांसाठी मुंबई बंद झाली, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीसुद्धा मुंबई बंद व्हावी. एक तास, दोन तास मुंबईनं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं. ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या राजधानीतूनच शेतकऱ्याला दिलासा देणारा आवाज निर्माण व्हावा', अशी अपेक्षा असून ही बाब आपण राज ठाकरे यांच्याकडेही व्यक्त केल्याचं कडूंनी सांगितलं. 

राजकारण नव्हे, शेतकरीच प्राधान्यस्थानी...! 

निवडणुकीचा विषय आता नाही असं म्हणताना, आमचा अजेंडा निवडणूक नसून, शेतकरी वाचवणं हा आहे याचाच पुनरुच्चार करत शेतकरी आंदोलनासंदर्भात राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचं कडूंनी माध्यमांना सांगितलं. राजकारण हे शेतकऱ्यांसाठी करायचं असेल तर शेतकरी, मेंढपाळ, मच्छीमार, दिव्यांग बांधव यांना न्याय मिळावा, 75 80 वर्षांपासून ही मंडळी वंचित आहेत, त्यांना न्याय मिळत नाहीये, या उपेक्षित वर्गाच्या चुलीवर राजकारणी भाकर शेकण्याच्या मताचा मी नाही असं बच्चू कडू स्पष्ट म्हणाले. 

निवडणुकीला व्हीहीपॅटही देत नाही मग राहिलं काय? 

'निवडणूक आहे, पण तिथं व्हीहीपॅटही देत नाही मग राहिलं काय?' असा खडा सवाल उपस्थित करत त्यांनी, निवडणूक घेण्यापेक्षा भाजप कार्यालयातच ठपके मारा आणि निवडणुका करा, असा टोला लगावला. 'माझा शेतकरी बाजूला पडू नये हाच एक मुख्य हेतू' असल्याचं सांगत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची एकत्र येणं हा कठीण विषय असून, शेतकरी निवडणुकीत एकत्र राहत नाही ही खंतही त्यांनी व्यक्त केली. 

शेतकरी म्हणून लढले ते कायम मागे पडले....

'जे जे शेतकरी म्हणून लढले ते राजकारणात मागेच पडले. मात्र तरीही राजकारण बाजुला ठेवून हा लढा उभा रहावा हेच लक्ष्य आहे', असं सांहत यंदाच्या रक्षाबंधनला आपण सरकारला वेदनेची राखी बांधणार आहोत असं म्हणत बच्चू कडू यांनी लक्ष वेधलं. 'आत्महत्यग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला सरकार, पंतप्रधान मोदींना वेदनेची राखी बांधणार आहेत', असं सांगत सरकारी धोरणामुळं शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या अतिशय गंभीर बाब असल्याचा मुद्दा त्यांनी जाता जाता लक्षात आणून दिला. 

FAQ

बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांची भेट का घेतली?
बच्चू कडू यांनी शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांपुढील आव्हाने, शेतमालाला योग्य भाव, दिव्यांगांचे प्रश्न आणि मराठवाड्यातील आंदोलनासाठी राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना संबोधित करावे, यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी 6 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली.

या भेटीत कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली?
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाला अपेक्षित भाव न मिळणे, दुष्काळापेक्षा गंभीर परिस्थिती, आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनाची गरज यावर चर्चा झाली. 

बच्चू कडू यांनी शेतमाल आणि शेतकरी आत्महत्यांबाबत काय म्हटलं?
बच्चू कडू यांनी सांगितलं की, शेतमालाला योग्य भाव न मिळणे ही दुष्काळापेक्षाही गंभीर समस्या आहे, ज्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. 

Read More