Maharashtra Political News : 65 वा महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) नुकताच पार पडला, जिथं अनेक नेतेमंडळींनी बहुविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत महाराष्ट्र दिन साजरा केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र या दिवशी कोणत्याही कार्यक्रमाला दिसले नाहीत. उलटपक्षी ते परदेशात सुट्टीसाठी गेल्याची बाब समोर आली आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. मुंबईत महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यासाठी ठाकरेंची अनुपस्थिती महायुतीच्या हाती त्यांच्यावर टीका करण्यासाठी आयतं कोलित देऊन गेली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सत्तेतील आणि विरोधी पक्षांतील नेतेमंडळींनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना नेतेमंडळींनी आदरांजली वाहिली पण, या साऱ्यामध्ये उद्धव ठाकरे मात्र कुठेच दिसले नाहीत.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधत ज्या मराठी अस्तित्वावरून ते भाष्य करतात त्याकडेच त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शेलार यांनी केला. 'एखादा नेता जो मराठी गौरवाविषयी वक्तव्य करत असतो त्यानं महाराष्ट्राच्या अतिशय महत्त्वाच्या दिवसाला बगल देणं अयोग्यच आहे', असं ते म्हणाले.
शेलारांच्या मागोमाग आता शिंदेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी केलेल्या संजय निरुपम यांनीसुद्धा ठाकरेंवर निशाणा साधला. 'महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना जेव्हा श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली तेव्हा ठाकरे कुटुंबानं मात्र परदेशी सुट्टीसाठी जाण्याचा पर्याय निवडला', अशा शब्दांत निरुपम यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.
इथं सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या या भूमिकेवर निशाणा साधलेला असतानाच संजय राऊतांना ज्यावेळी यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनीसुद्धा या प्रश्नाला बगल दिली. दरम्यान तिथं महायुतीनं महाराष्ट्र दिनी एकजूट दाखवत राजकीय वर्तुळात साऱ्यांचच लक्ष वेधलं हेसुद्धा तितकंच खरं.