Uddhav thackeray Raj thackeray Possible Alliance : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय वाटा साधारण दोन दशकांपूर्वी वेगळ्या झाल्या. त्यानंतर राजकीय मंचावर हे दोन्ही भाऊ तसे एकत्र दिसलेच नाहीत. मात्र, हिंदी- मराठी वादादरम्यान मराठी भाषेसाठी या दोन्ही नेत्यांनी, भावांनी एकत्र येत मराठी मनं जिंकली. मराठी मुद्द्यावर झालेला त्यांचा विजयी मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड ठरली, जिथं एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणत खुद्द उद्धव ठाकरे यांनीच युतीचे संकेत दिले.
तत्पूर्वीपासूनच मागील काही दिवसांमध्ये शिवसेना UBT आणि मनसेच्या नेत्यांची वक्तव्य आणि त्यातून सुरू असणाऱ्या युतीच्या चर्चांनी जोर धरल्यामुळं राज्यातील राजकीय समीकरणं पुन्हा नवं वळण घेण्याचे संकेत मिळू लागले आहेत. ही एकंदर परिस्थिती पाहता महायुतीनं सावध होत आता आगामी रणनिती आखण्यास सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे. नुकतीच झालेली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीतील भेट त्याच रणनितीचा भाग असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उद्धव ठाकरे यांनी राजकीय युतीचे संकेत दिल्यामुळं त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. या भेटीदरम्यान ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या महापालिका निवडणुकीवरील परिणामांबाबत चर्चा झाली. भाजपनेही या संदर्भात काही खासगी संस्थांमार्फत सर्वेक्षण केलं असून, त्याच्या निष्कर्षाची माहिती शाह यांनी शिंदे यांना दिल्याचंही कळतंय. भाजपचं लक्ष्य आता मुंबई महापालिका असून ठाकरे बंधू निवडणुकीत एकत्र आले तर त्याचे कसे परिणाम होतील, याबाबत भाजपच्या दिल्लीतील नेत्यांमध्ये चिंता असल्याचं म्हटलं जातंय
दिल्लीतील शाह- शिंदे यांच्या भेटीत अनेक राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. मात्र त्यातही ठाकरेंची युती हा महत्त्वाचा मुद्दा होता. ही युती महायुतीला पटणारी नसून त्या धर्तीवर ही चर्चा झाल्याचं सूत्रांमार्फत कळत आहे. ही युती झाली तर मुंबई महानगरपालिकेवर काय परिणाम होऊ शकतो यासंदर्भात भाजपनं केलेल्या सर्व्हेक्षणाची माहिती शिंदेंना देत कोणत्या पक्षाला जवळ करावं याचंही मार्गदर्शन केल्याचं कळत आहे. येत्या काळात अशी युती झालीच तर नेमकं काय करावं यासाठीची संभाव्य चाचपणीसुद्धा या भेटीदरम्यान घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तेव्हा आता राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नेमकी कोणती बेरीज- वजाबाकी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार हेच खरं.