jitendra awhad vs gopichand padalkar rada saamana editorial : 'भाजपमधील हवशे, गवशे महाराष्ट्राचा पाया उखडायला निघालेत' असा नाराजीचा तीर्व सूर आळवत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शिवसेना UBT पक्षाचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना'च्या अग्रलेखातून कडाडून टीका करण्यात आली आहे.
बाळासाहेब खेर, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्या चारित्र्य व निष्पक्षतेच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस नक्की कोठे उभे आहेत? असा खडा सवाल अग्रलेखातून करत गुंडांच्या टोळ्या जमवून ते राज्य करत असल्याचा घणाघात करण्यात आला. दुर्योधन माजतील आणि लोकशाही, संसदीय परंपरांचा खून करतील, अशी स्थिती भाजपसह त्यांच्या दिल्लीतील 'आका' मंडळींनी महाराष्ट्रात निर्माण केली आहे असं म्हणत महाराष्ट्राचा राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक वारसा उद्ध्वस्त व्हावा यासाठी हे सुरू असल्याची टीका करण्यात आली आहे.
राज्यातील एकंदर राजकीय स्थिती पाहता महाराष्ट्राबरोबरच मुख्यमंत्री फडणवीस स्वतःचेही अवमूल्यन करून असल्याचं म्हणताना मुख्यमंत्री येतील आणि जातील हे सूचक वक्तव्य अग्रलेखातून करण्यात आलं. 'भाजपमधील हवशे, गवशे महाराष्ट्राचा पायाच उखडायला निघाले आहेत', अशा शब्दांत सत्ताधारी पक्षाला शिवसेना UBT नं धारेवर धरलं आहे.
इथं उत्क्रांतीचा सिद्धांत मांडत माकडांची माणसं झाली, पण महाराष्ट्राच्या विधान भवनात जे घडलं ते पाहता लोकप्रतिनिधींचीच माकडं झाल्याचं विधान यावेळी करण्यात आलं. इतक्यावर न थांबवा, या माकडांनी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला कलंकित केलं आहे. ज्याला आपण कायदेमंडळ म्हणतो, त्या कायदेमंडळाच्या दाराशी आमदारांनी पोसलेल्या दोन टोळ्या भिडल्या.
महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचे असे विकृतीकरण करणारे हे सर्व टोळभैरव भारतीय जनता पक्षात भरती केले असून त्यांचं नेतृत्व मुख्यमंत्री फडणवीस करत असल्याची तोफ सामना अग्रलेखातून डागण्यात आली. बरं इतकं सारं करून ही मंडळी राज्याच्या संस्कृतीवर आणि नैतिकतेवर गप्पा मारतात याचे आश्चर्य वाटते, असा उपरोधिक टोलासुद्धा लगावला.
आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीला टोळ्यांमधील संघर्ष असं नाव देत विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना सभागृहाच्या पायरीवर फक्त हत्यारं उपसायचीच बाकी होती, या शब्दांत राज्याच्या राजकीय परिस्थितीतील दूरवस्था अग्रलेखातून अधोरेखित करण्यात आली.
फडणवीस यांनी सामाजिक विघटनवाद्यांना रोखण्यासाठी 'जनसुरक्षा कायदा' आणला खरा मात्र शहरी नक्षलवाद्यांचे नमुने त्यांच्याच पक्षात आहेत आणि त्यांना थेट विधान परिषदेत आणून फडणवीस स्वतःचेच वस्त्रहरण करून घेत आहेत असं म्हणत भाजपने महाराष्ट्राची राजकीय सूत्रं हाची घेतल्या क्षणापासून विधीमंडळाचं कामकाज दर्जाहीन होत गुंडांनाही उमेदवारी देण्याचा हा परिणाम असल्याचाच पुनरुच्चार अग्रलेखातून करण्यात आला.