HSC Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल 91.88 टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात 1.49 टक्क्यांनी घट झाली आहे. दरम्यान राज्यात पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. 96.74 टक्क्यांसह कोकण पहिल्या क्रमांकावर असून, लातूर 89.46 टक्क्यांसह शेवटच्या क्रमांकावर आहे. मुलांच्या तुलनेत 5.07 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करत भरघोस यश मिळवलं आहे. कोल्हापूरच्या प्राची मनोहर लाखे हिनेदेखील अशीच काहीशी कामगिरी केली आहे.
प्राची मनोहर लाखेने बारावीच्या परीक्षेत 75 टक्के गुण मिळवले आहेत. घरी बेताची परिस्थिती, वडिलांचं निधन, आईचा अपघात अशा स्थितीतही तिने यश मिळवत जिद्द काय असते हे दाखवून दिलं आहे. विशेष म्हणजे, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर काम करायची. मात्र यातील कशाचाही तिने आपल्या अभ्यासावर परिमाण होऊ दिलं नाही.
प्राचीचा जन्म होण्याआधीच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. यामुळे आईनेच तिला लहानाचं मोठं करण्याची जबाबदारी उचलली होती. आई धुणीभांडी करत आपल्या मुलीला वाढवत होती. पण मुलीसाठी झटणाऱ्या आईचा अपघात झाला आणि कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला. अभ्यासाची पुस्तकं हातात घेण्याच्या वयात प्राचीवर आर्थिक जबादारीही आली. पण ती डगमगली नाही आणि जिद्दीने परिस्थितीला सामोरी गेली.
प्राचीने मन राजाराम कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. शिक्षण घेत असतानाच ती उद्यमनगर येथील पेट्रोल पंपावर दिवसभर काम करायची. सकाळी कॉलेज आणि 11 ते 6 पेट्रोल पंपावर काम असा तिचा दिनक्रम चालत असे. महत्त्वाचं म्हणजे तिने एक दिवसही आपलं कॉलेज चुकवलं नाही. आपल्या याच जिद्दीसह तिने बारावीच्या परीक्षेत 75 टक्के गुण कमावले. निकाल लागला तेव्हाही प्राची पेट्रोल पंपावर काम करत होती. प्राचीचे कष्ट आणि जिद्द अनेकांसाठी प्रेरणा देणारे आहेत.