Prada Team in Kolhapur: कोल्हापुरी चप्पलचे मॉडेल प्राडाने कॉपी केल्याची टीका होताच प्राडा कोल्हापुरी चपलांसाठी पुढे सरसावली आहे. इटली वरून प्राडाची सहा जणांची टीम कोल्हापुरात दाखल झालीये. या टीमनं कोल्हापुरातील चप्पल लाईनला भेट दिली. त्याचबरोबर कोल्हापुरी चपलेची वैशिष्ट्य, बनवताना लागणारी अस्सल कारागिरी या सर्वांची माहिती घेतली.
जगात भारी कोल्हापुरी असं आपण कौतुकाने म्हणतो. इटालियन कंपनी प्राडानंही आता हे मान्य केलंय. प्राडालाही कोल्हापुरी चपलेची भुरळ पडलीये. कोल्हापुरी चपलेवरून निर्माण झालेल्या वादानंतर प्राडाच्या काही सदस्यांनी थेट कोल्हापूर गाठलं. नुसतं कोल्हापूर गाठलं नाही तर कोल्हापुरी चप्पल बनते कशी?, कलाकुसर कशी केली जाते?, अशी एकूण एक माहिती जाणून घेतली.
बरं प्राडाचे सदस्य इतक्यावरच थांबले नाहीत तर जिथं कोल्हापुरी चप्पल विकली जाते त्या दुकानांना भेट देत तेथील व्यावसायिकांशीही संवाद साधला. दुकानांमधील कोल्हापुरी चपलेचे विविध प्रकार पाहून प्राडाचे सदस्य थक्क झाले. प्राडाच्या या कोल्हापूर दौ-यानंतर प्राडा आणि कोल्हापुरी चपलेचा वाद आता निवळण्याची शक्यता आहे.
इटलीतील मिलान फॅशन विकमध्ये प्राडाकडून कोल्हापुरी चपलेचा वापर करण्यात आला. असे करताना प्राडाकडून कोल्हापूरच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आला. चपलेचं उत्पादन आपलंच असल्याचा प्राडाचा दावा होता. यानंतर फॅशन विकमधील चपलेवरून मोठा वाद निर्माण झाला. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधींनी प्राडाला पत्र लिहिलं. अनेक तक्रारींनंतर प्राडाकडून कारागिरांशी संवाद साधण्याची तयारी प्राडा सदस्यांनी दाखवली. दरम्यान प्राडाच्या कोल्हापूर भेटीमुळे कोल्हापुरी चपलेला जागतिक स्तरावर मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल अशी अपेक्षा कोल्हापुरातील चप्पल व्यावसायिकांनी व्यक्त केलीये.
प्राडाची ही टीम इटलीला परत गेल्यानंतर आणखी एक टीम कोल्हापुरात येणार आहे.त्यानंतर कारागिरांशी करार केला जाणार आहे. म्हणजे आपली कोल्हापुरी चप्पल सातासमुद्रापार पोहोचणार आहे. त्यामुळे परदेशात गेल्यावर तेथील नागरिक कोल्हापूर चप्पल घालून फिरताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको.