लाडकी बहीण योजनेच्या छाननीत जवळजवळ 45 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार असल्याची माहिती आहे. त्यावरून आता बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे. लाडकी बहीण योजनेतील महिलांना अपात्र करु नये यासाठी बच्चूभाऊ कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. सरकारनं सुरु केलेल्या पडताळणीवर कडूंनी टीका केली आहे.
लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत लाखो बहिणींना डच्चू देण्यात आला आहे. अपात्र महिला लाभार्थ्यांची ही संख्या जवळपास 45 लाखांपर्यंत जाईल असा अंदाज सरकारमधीलच सूत्र वर्तवत आहेत. सरकारची वेगवेगळ्या पातळ्यांवर पडताळणी आणि छाननी सुरु आहे. त्यामुळे या महिन्याचा पंधराशेचा हप्ता आला आहे. पुढच्या महिन्याचा हप्ता येणार की नाही अशी भीती बहिणींच्या मनात आहे. बच्चू कडूंनी लाडकी बहीण योजनेतील छाननीविरोधात कोर्टात जाण्याचा निर्धार केला आहे.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. विरोधक आता वेगवेगळ्या माध्यमातून संभ्रम पसरवत असल्याचा आरोप सुनील तटकरेंनी केला आहे.
बच्चू कडू एकेकाळी महायुतीचा भाग होते. आता त्याच बच्चूभाऊंनी बहिणींच्या पंधराशे रुपयांच्या अनुदानासाठी कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. सुरुवातीला 2-5 लाख महिला योजनेबाहेर जातील असा दावा करण्यात येत होता. आता तोच आकडा 45 लाखांच्या घरात जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जेव्हा अंतिम छाननी होईल तेव्हा नेमक्या किती लाडक्या बहिणी लाभार्थी राहतील अशी कुजबूज आता सुरु झाली आहे.