Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

प्रवीण गायकवाडांना काळं फासणाऱ्याचं BJP कनेक्शन! बावनकुळेंबरोबर फोटो; म्हणाले, 'भाजपच्या रक्तात...'

Pravin Gaikwad BJP Connection Bawankule Reacts: या हल्ल्यानंतर हल्लोखोराचा बावनकुळेंसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया नोंदवलीये.

प्रवीण गायकवाडांना काळं फासणाऱ्याचं BJP कनेक्शन! बावनकुळेंबरोबर फोटो; म्हणाले, 'भाजपच्या रक्तात...'

Pravin Gaikwad BJP Connection Bawankule Reacts:  समाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये रविवारी सायंकाळी हल्ला करण्यात आला. संभाजी ब्रिगेड या संस्थेच्या नावात संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याने हा हल्ला करण्यात आल्याचा दावा केला आहे. भारतीय जनता पार्टीचे सक्रीय पदाधिकारी दिपक काटेंच्या नेतृत्वाखाली हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. काटेंचा संबंध माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसोबत असल्याचा दावा केला जात आहे. हल्लेखोर बावनकुळेंचा निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जात आहे. बावनकुळेंसोबतचा काटेंचा फोटो ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोस्ट केला आहे. या आरोपाला स्वत: बावनकुळेंनी उत्तर दिलं आहे. 

अंधारे काय म्हणाल्या?

"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॅार्डवरील गुन्हेगार आहे. भाजपाचा सक्रिय पदाधिकारी आहे. बावनकुळेंचा निकटवर्तीय आहे. या कामगिरीसाठी एखादी आमदारकी/ खासदारकी/ महामंडळ देऊनच टाका. भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय," असा टोला अंधारेंनी लगावला आहे. 

या पोस्टमध्ये अंधारेनी काटेंचा बावनकुळेंसोबतचा फोटोही पोस्ट केला आहे.

बावनकुळे म्हणतात, हे भाजपच्या रक्तात...

या आरोपांसंदर्भात भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया नोंदवातना या हल्ल्याचा भाजपाशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. "प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही, अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे भाजपच्या रक्तात नाही," असं बावनकुळे म्हणालेत. "प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल झालेल्या घटनेची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. आमचा याच्याशी काहीही संबंध नाही, भाजपचा कार्यकर्ता आहे पण कारवाई झाली पाहिजे," असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.  "प्रवीण गायकवाड प्रकरणी कारवाई झाली पाहिजे. भाजपचा याच्याशी कुठलाही संबंध नाही तसेच आरोपी कोणत्याही पक्षाचा असो तो आरोपी आहे," असं बावनकुळेंनी अधोरेखित केलं. 

नक्की वाचा >> '...तर भिडेंच्या नावातल्या 'संभाजी'चं काय करायचं?' प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर सवाल; 'भाजपच्या पात्रता परीक्षेत...'

त्या फोटोबद्दलही नोंदवलं मत

सुषमा अंधारेंनी बावनकुळेंसोबत हल्लेखोराचा फोटो असल्याची पोस्ट केल्यावरुनही त्यांनी उत्तर दिलंय. "सुषमा अंधारेंना माहीत राहायला पाहिजे ते कार्यकर्ते सगळ्या मंत्री आणि नेत्यांसोबत फोटो काढतात. पोलिसांनी योग्य कारवाई करायला पाहिजे," असं बावनकुळे म्हणाले. 

भाजपाने पेरलेल्या विषाला उकळी

उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन या हल्ल्याबद्दल बोलताना, प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच! शिवरायांच्या मुलखात हे काय सुरू आहे?" असा सवाल राऊतांनी विचारलाय. तसेच, "भाजपाने पेरलेल्या विषाला उकळी फुटली आहे! महाराष्ट्र अराजकाच्या कड्यावर उभा आहे," असंही राऊत म्हणालेत.

Read More