Pravin Gaikwad Akkalkot Attack: अक्कलकोटमध्ये रविवारी सायंकाळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतानाच कठोर शब्दांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. अशातच ज्या कारणासाठी हा हल्ला करण्यात आला ते फारस थिल्लर असल्याचंही निषेध करणाऱ्यांनी म्हटलं आहे. नेमकं कोण काय म्हणालाय पाहूयात...
भ्याड हल्ला निंदनीय असल्याचा प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हेंनी दिली आहे. "या प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचे नाव समोर येत असून, भाजपाने यावर स्पष्टीकरण द्यावे विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे, प्रवीण गायकवाड यांच्यावरचा भ्याड हल्ला ही वैचारिक दिवाळखोरी आहे," अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हेंनी दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यामध्ये स्पष्ट भूमिका घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणीही कोल्हेंनी केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन या हल्ल्याबद्दल बोलताना, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच! शिवरायांच्या मुलखात हे काय सुरू आहे?" असा सवाल राऊतांनी विचारलाय. तसेच, "भाजपाने पेरलेल्या विषाला उकळी फुटली आहे! महाराष्ट्र अराजकाच्या कड्यावर उभा आहे," असंही राऊत म्हणालेत.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरुन या प्रकरणावर भाष्य केलं आहे. "महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे भ्याड हल्ला करण्यात आला. त्यांच्या तोंडावर शाई फेकण्यात आली. हे सर्व अतिशय अस्वस्थ करणारे असून या घटनेचा निषेध करावा तितका कमीच आहे. हे निषेधार्ह कृत्य करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे,", असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही सोशल मीडियावरुन हल्ला कोणत्या कारणासाठी केला या मुद्द्यावरुन टीका केली आहे. "प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॅार्डवरील गुन्हेगार आहे. भाजपाचा सक्रिय पदाधिकारी आहे. बावनकुळेंचा निकटवर्तीय आहे. या कामगिरीसाठी एखादी आमदारकी/ खासदारकी/ महामंडळ देऊनच टाका. भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय," असा टोला अंधारेंनी लगावला आहे. "बाय द वे संभाजी ब्रिगेडमध्ये संभाजी हे नाव एकेरी आहे असं जर हल्ल्याचं कारण देत असाल तर भिडेंच्या नावातल्या संभाजीच काय करायचं?" असा सवाल अंधारेंनी केलाय.
तर आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. "बहुजन समाजात अनेक उद्योगपती घडवणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करणाऱ्या विकृतीचा जाहीर निषेध. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार समाजात रुजवण्याचं खूप मोठं कार्य प्रवीणदादा गायकवाड यांच्या हातून होत आहे. अभ्यासाच्या बळावर त्यांनी अनेकांना उघडं पाडण्याचं काम केलं म्हणून तर समाजकंटकांनी त्यांच्याशी अशा प्रकारे गैरकृत्य केलं नाही ना? याचाही तपास झाला पाहिजे. तसंच हे कृत्य करणारी व्यक्ती कोणत्या पक्षाशी आणि विचारांशी संबंधित आहे हे उघड आहे. त्यामुळं या भ्याड कृत्यामागील मास्टरमाईंडचाही पोलिसांनी शोध घ्यावा. आम्ही सर्वजण प्रवीणदादा गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहोत.", असं रोहित पवार म्हणाले.