Private Bank Scam: पैसे सुरक्षित राहावे म्हणून आपण बॅंकांची मदत घेतो. बॅंका या आरबीआयच्या गाईडलाइननुसार व्यवहार करत असतात. त्यामुळे नागरिक आपल्या मेहनतीची जमापुंजी निर्धास्तपणे बॅंक खात्यात जमा करतात. पण इथूनच तुमची फसवणूक झाली तर? यात चूक कोणाची असेल? संबंधित बॅंक कर्मचाऱ्याची की विश्वास ठेवणाऱ्या ग्राहकाची? अशी फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
ग्रामीण भागात खासगी बँकांमध्ये पैसा ठेवणे आता असुरक्षित झाले आहे. कारणही तसंच आहे. ग्राहकांच्या बँक अकाउंटमधून थेट पैशांचा अपहार होत आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव भागात अशाच दोन घटनांमध्ये पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. कळवण भागातील ॲक्सिस बँकेमध्ये तुषार गोसावी हा बॅंक कर्मचारी काम कामाला होता. ललिता मोरे या ग्राहकाने बँकेतील व्यवहारांसाठी तूषारकडून एटीएम तसेच मोबाईल बँकींगची माहीती घेतली. तुषारने त्याचा फायदा घेतला आणि जुलै 2021 ते मार्च 2024 च्या दरम्यान एकूण 15 लाखांची फसवणुक केली. ललिता मोरे यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून अँक्सिस बँकेचा कर्मचारी तुषार गोसावीच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अन्वये कलम 409 आणि 420 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. यानंतर आरोपी तुषार गोसावी यास अटक करण्यात आली. दरम्यान आरोपी गोसावी यास आज कळवण सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीसाकोठडीत ठेवण्यात आलेय.
दुसरीकडे मालेगावमध्ये अशीच घटना घडली. मालेगाव येथील शहर पोलीस ठाणे हद्दीतील आयसीआय बँक मालेगाव शाखेतील नोव्हेंबर 2022 ते 10 जुलै 2024 दरम्यान कर्मचारी म्हणून काम करीत असलेला आकाश नामदेव इंडाईत यानेही असाच काहीसा प्रकार केलाय. महिला बचत गटाचे खोटे कारण सांगून सहीचे व रक्कम नसलेले कोरे चेक घेतले. त्यातून पैसे काढून काही रक्कम त्याने ईएमआय स्वरूपात मनमाड शाखा येथे भरली. त्यापैकी 19 लाख 28 हजार 407 रुपयाची रक्कम अद्याप भरली नाही. त्यामुळे रकमेचा अपहार करून तक्रारदार आणि संबंधित गटाची फसवणूक केल्याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय.
बँकेतील कर्मचारी थेट तुमच्या घरी येऊन तुम्हाला थेट व्यवहाराच्या सोयी उपलब्ध करून देत असेल
तुमच्या बँकेतील अकाउंटमध्ये एफडी करण्यासाठी तुमच्या घरी येत असतील
तुमचा डेबिट कार्ड आणि मोबाईल ॲप सुरू करून देण्याच्या बहाण्याने पासवर्ड मागितला जात असेल
केवायसीच्या बहाण्याने थेट घरी येऊन फोटो काढत आणू शकता तुम्हाला अडचणीत
मनमाडमध्ये युनियन बँकेमध्ये बनावट एफडी तयार करून लोकांचे कोट्यावधी रुपये अशाचप्रकारे लुटण्यात आले होते. तक्रारदारांना अद्याप ते मिळाले नाहीत. त्यामुळे बँकेतील व्यवहार करताना तिथल्या कर्मचाऱ्यांशी सांभाळूनच व्यवहार करा. अन्यथा तुमचे बँक खाते साफ होण्यास वेळ लागणार नाही.