Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

चंद्रशेखर बावनकुळेंचे 'कडू' बोल, शेतक-यांच्या प्रश्नांसाठी होणारी आंदोलनं म्हणजे 'नौटंकी'

अमरावतीतल्या एका कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही आंदोलनं म्हणजे नौटंकी आहे, असं म्हटलं. त्यावरून बच्चू कडूंनी बावनकुळेंना तिखट शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं.

चंद्रशेखर बावनकुळेंचे 'कडू' बोल, शेतक-यांच्या प्रश्नांसाठी होणारी आंदोलनं म्हणजे 'नौटंकी'

अनिरुद्ध दवाळे (प्रतिनिधी) अमरावती :  शेतक-यांच्या प्रश्नांसाठी राज्यात अनेक आंदोलनं होतात. अमरावतीतल्या एका कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही आंदोलनं म्हणजे नौटंकी आहे, असं म्हटलं. त्यावरून बच्चू कडूंनी बावनकुळेंना तिखट शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं. बच्चू कडूंच्या आंदोलनावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्यावर प्रहार केला. अमरावतीच्या मोर्शीतील एका शासकीय कार्यक्रमात सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचताना त्यांनी कडूंचं नाव न घेता टीका केलीय. काहीजण उपोषण आणि आंदोलनाची नाटकं करतात, असं बावनकुळे म्हणाले. आंदोलन करणा-यांनी सत्ता असताना काहीही केलेलं नाही. दिव्यांगांचं मानधन मुख्यमंत्र्यांनी वाढवल्याचंही त्यांनी सांगितलं. यावरून कडूंनी बावनकुळेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणं हा शेतकऱ्यांचा अपमान आहे, बावनकुळेंनी शेतकऱ्यांना शिव्या देणं बंद केलं पाहिजे, असं कडू म्हणाले आहेत. 

बावनकुळेंच्या विधानावर शेतकरी संघटनेचे नेते अजित नवले यांनीही प्रतिक्रिया दिलीये. बावनकुळेंनी केलेल्या वक्तव्याचा अजित नवलेंकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. 

कडूंचा आक्रमक पवित्रा पाहता आज मात्र बावनकुळेंनी सारवासारव केली. मी काही कडूंचं नाव घेतलं नाही, मी जे नौटंकी करून आंदोलन करणा-यांबद्दल बोललो, असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी कडूंच्या टीकेनंतर दिलं आहे. 

दिव्यांग आणि शेतकरी कर्जमाफीवरून बच्चू कडू यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. दिवाळीपर्यंत शेतक-यांची कर्जमाफी न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय.  दरम्यान कडूंच्या याच मुद्द्यावरून अमरावतीत जात बावनकुळेंनी नाव न घेता कडूंवर शरसंधान साधल. आणि पुन्हा एकदा बावनकुळे-कडून आमनेसामने आले आहेत. 

Read More