Leopard Attack CCTV Footage: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घराच्या अंगाणात झोपलेल्या पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला केला. हा सारा थरार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. विशेष म्हणजे ज्या कुत्र्यावर हल्ला करुन बिबट्या घेऊन गेला त्याच्या पाहून अवघ्या हाताभराच्या अंतरावर एक तरुण मोबाईलवर पाहत होता. बिबट्याने हल्ला केल्यानंतर कुत्र्याचा आवाज ऐकून या तरुणाला मोबाईलमधून बाहेर पाहण्याचा वेळ मिळाला. मात्र त्याला काही कळेपर्यंत बिबट्या कुत्र्याला घेऊन गेला होता.
पुण्याच्या भोर तालुक्यातील देगांव गावात हा सारा प्रकार घडला आहे. घराच्या अंगणात झोपलेल्या पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने अगदी शांतपणे ही शिकार केली. पाळीव कुत्र्याच्या मान कुठे आहे, हा कुत्रा आपल्या जबड्यात कसा मावेल या साऱ्याचा विचार करुन बिबट्याने हल्ला केल्याचं पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देगांव गावातील ठाकरे फार्महाऊस येथे शेतकरी जयानंद काळे हे त्यांच्या घरासमोरील अंगणात खाटेवर झोपले होते, यावेळी त्यांच्या खाटेशेजारी झोपलेल्या त्यांच्या पाळीव श्वानावर बिबट्याने दबक्या पावलाने येत हल्ला केला. यामध्ये शेतकरी जयानंद काळे हे थोडक्यात बचावलेत, मध्यरात्री 3:30 च्या दरम्यान ही घटना घडली. हा सारा प्रकार घडला तेव्हा जयानंद काळे हे मोबाईल पाहत होते. मात्र एवढ्या जवळ येऊन बिबट्याने आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन गेल्याचे समजलेही नाही. कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याचं समजल्यानंतर मालकाने घरात पळ काढल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तुम्हीच पाहा हा धक्कादायक व्हिडीओ...
घटनेनंतर काळे यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली. ही सर्व थरारक घटना त्यांच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. गेल्या काही दिवसात या परिसरामध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले आहेत. त्यामुळं नागरीकांमध्ये दहशत पसरली आहे.
वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांरी करत आहेत. भोरबरोबरच जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्येही बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. अनेकदा ऊसाच्या शेतात बिबटे आसरा घेतात. पुण्यातील या तीन-चार तालुक्यांमध्ये बिबट्यांचा प्रश्न हा मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत असल्याचं दिसत आहे. वनविभागाकडूनही अनेकदा या अशा घटनानंतर पिंजरे लावले जातात. मात्र यात बिबटे अडकतातच असं नाही. म्हणूनच गावकरी दहशतीच्या सावटाखाली वावरताना दिसतात. वनविभागाकडून अशा क्षेत्रांमध्ये सतर्कतेचे फलक आणि इतर सूचना देणारी जनजागृती वारंवार केली जाते. मात्र त्यानंतर बिबट्यांचे माणसांवरील हल्ले कमी झालेले नाहीत.