Deenanath Mangeshkar Hospital Social Activist Post: पुण्यातील नामवंत अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीला उपचार नाकारण्यात आले. पैशाअभावी रुग्णालयाने उपचार केल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आमदार अमित गोरखेंनी हा आरोप केला असून यानंतर आता अनेकजण समोर येत आहेत. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही एक्स अकाऊंटवरुन या रुग्णालयासंदर्भातील एक आर्थिक व्यवहाराचा उल्लेख करत पोस्ट केली आहे.
विजय कुंभार यांनी, "दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आधी पैसे भरले नाहीत म्हणून रुग्णावर उपचार नाकारले. हॉटेलमध्येसुद्धा जेवण झाल्यानंतर बिल घेतात, गाडी दुरूस्त करणारासुद्धा काम झाल्यानंतर बिल घेतो. मात्र खाजगी रुग्णालयामध्ये पेशंटने आधी पैसे भरल्याशिवाय त्याला हात सुद्धा लावला जात नाही. त्याची काही कारणे कदाचित असतीलही परंतू कारणं काहीही असोत असं करणं हे अमानवी आहे एवढं नक्की," असं म्हटलं आहे.
तसेच विजय कुंभार यांनी आता प्रशासन काय भूमिका घेणार असा सवालही विचारला आहे. "यात शासन आणि पुणे महापालिका प्रशासन यांची काय भूमिका असणार आहे? की मूग गिळून गप्प बसणार आहेत? अशा रुग्णालयांना आतापर्यंत काय आणि किती सवलती दिल्या, किती वेळा कोणत्या कारणांसाठी दंड लावला आणि तो वसूल केला की नाही ? याची श्वेतपत्रिका दोघांनी प्रसिद्ध केली पाहिजे," अशी मागणी कुंभार यांनी केली आहे. "पैशाअभावी कुणावरही उपचार नाकारले जाणार नाहीत हे पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि थोडासा दंडुका उगारला तर ते सहज शक्य आहे. सरकारी कुबड्यांशिवाय अशी रुग्णालये श्वासही घेऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. फक्त सरकारला रुग्णांची काळजी घ्यायला पाहिजे असे कधी वाटणार एवढाच खरा प्रश्न आहे," असा टोला विजय कुंभार यांनी लगावला आहे. त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी 'रुग्णालय_की_दुकान', 'सरकारी_सवलतीचा_हिशोब_द्या', 'पुणे_महापालिका_जागो' असे हॅशटॅगही वापरले आहेत.
अन्य एका पोस्टमध्ये कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी सवलत दिल्याचा तपशील पोस्ट केला आहे. "आत्ता आत्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य शासनाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुण्यातील जवळपास आठ हजार चौरस फुट जागा वार्षिक नाममात्र एक रुपया भाड्याने दिली आहे. यापूर्वी रुग्णालयासाठी दिलेली जमीन ही अशीच नामामात्र भाड्याने दिलेली आहे. आत्ता दिलेल्या जमिनीची किंमत सध्याच्या बाजार भावाने कमीत कमी 10 कोटी रूपये तरी असेल. रुग्णालयांने मात्र 10 लाख रूपये आगाऊ भरले नाहीत म्हणून उपचार नाकारले आणि रूग्ण दगावला. काय अर्थ लावायचा या सगळ्यांचा?" असा सवाल कुंभार यांनी विचारला आहे.
18 फेब्रुवारीच्या शासन निर्णयाची यादी कुंभार यांनी शेअर केली आहे.
महसूल विभागाने याच निर्णयासंदर्भात जारी केलेली माहितीचं पत्रकही कुंभार यांनी शेअर केलं आहे.
सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना 29 मार्च रोजी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. तनिषा या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या आणि त्यांना रक्तस्त्राव होत होता. हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी भिसे कुटुंबियांकडून 20 लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती दिली. दहा लाख रुपये भरले तरच उपचार केला जाईल असं थेट रुग्णालयाकडूनच सांगण्यात आलं. ज्यावर कुटुंबीयांनी अडीच लाख रुपये भरतो, असं सांगितलं. मात्र रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी ते मान्य न केल्यानं नाईलाजास्तव भिसे कुटुंबीयांना तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जावं लागलं. यादरम्यान त्यांचा रक्तस्त्राव वाढला. वाकडच्या रुग्णालयात त्यांनी दोन मुलींना जन्म दिला मात्र प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. पुण्यातल्या रुग्णालयात वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता असं गोरखे यांनी म्हटलं आहे.