Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुण्यात कोयता विकण्यावरुन नवरा बायकोमध्ये भांडण; एकमेकांवरच केला जीवघेणा हल्ला

Pune Crime : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांकडून सर्रासपणे कोयत्याचा वापर करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच पुण्याच्या एका घरात कोयता विकण्यावरुन जोरदार वाद झाला आहे. हा वाद इतका टोकाला गेला की दोघांनी एकमेकांवरच वार केल्याचा दावा करण्यात आला आहे. 

पुण्यात कोयता विकण्यावरुन नवरा बायकोमध्ये भांडण; एकमेकांवरच केला जीवघेणा हल्ला

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : विद्येचे माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राज्यधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात (Pune Crime) कोयता गॅंगने (Koyta Gang) उच्छाद मांडला आहे. शहरात आपले वर्चस्व दाखविण्यासाठी छोट्या मोठ्या टोळ्यांकडून कोयत्याचा वापर होताना दिसतो. कोयता गँग म्हणून अनेक टोळ्या कुप्रसिद्ध झाल्या आहे. पण कोयत्यावरुन कोणाची घरात भांडणे होतील असे कधी वाटले नव्हते. पुण्यात एका घरात कोयता विकण्यावरुन पती पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. तो इतका वाढला की त्यांनी पती पत्नीनेच एकमेकांवर कोयत्याने वार केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहे. दोघांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी (Pune Police) पती पत्नीवर गुन्हे दाखल केले आहेत.

हा सगळा प्रकार मार्केटयार्ड येथील एका सोसायटीत 29 जून रोजी दुपारी दीड वाजता घडला. 37 वर्षाच्या पीडित पतीचे नवी पेठेत सलून आहे. तक्रारदार पती हा त्याची पत्नी आणि सात वर्षाच्या मुलासह राहतात. त्यांच्याकडे काही दिवसांपूर्वी कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ आले होते. त्यांनी झाडे कापण्यासाठी कोयता किंवा कैची विकत मागितली होती. मात्र पतीने कोयता विकण्यास नकार दिला. त्यानंतर पत्नीला घरातच कोयता दिसल्याने तिने कोयता विकून टाका असे सांगितले.

त्यावर पतीने कोणी कोयत्याचा गैरवापर केल्यास आपल्यालाच त्रास होईल, असे पत्नीला सांगितले. त्यावर पत्नीने तुम्हाला घरात भंगार ठेवायला का आवडते? पैसे मिळत असतील तर तुम्ही कोयता विकत का नाही, असे म्हणून वाद घातला. पत्नीला समजावून सांगत  असतानाच दोघांमध्ये वाद वाढला. त्यानंतर पत्नीने हातात कोयता घेत आपल्याला मारला असे तक्रारदार पतीने सांगितले. मला खाली पाडून पत्नीने हाताने व लाथेनेही मारहाण केली, असेही पतीने फिर्यादीत म्हटले आहे.

दुसरीकडे पतीनेच आपल्यावर कोयत्याने हल्ला केल्याचे पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. "कोयता विकण्यावरुन त्यांच्यात वाद झाल्यानंतर मी पतीला ठीक आहे, विकत नसणार तर कोयता माझ्या कामाला येईल, असे म्हटले होते. या बोलण्यावरुन पतीने मला हाताने मारहाण केली. मी घराबाहेर जाण्यासाठी दाराची कडी उघडत असताना पतीने पाठीमागून येऊन तोच कोयता माझ्या डोक्यात मारला. मी ओरडत असताना पुन्हा माझ्या डोक्यात कोयता मारुन मला गंभीर जखमी केले," असे पत्नीने फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी दोघांवरही गुन्हे दाखल करत तपास सुरु केला आहे.

Read More