निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे : (Pune Crime News) अंधश्रद्धेच्या प्रकारांना खतपाणी घालणारी एक घटना पुण्यात घडली असून, या अघोरी प्रकारानं अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. पुण्यातील या प्रकारामुळं समाजात अद्यापही या रुढी तळ ठोकून असल्याचं दुर्दैवी वास्तव पाहायला मिळत आहे.
पुण्याच्या राजगड तालुक्यातील हिरपोडी गावामध्ये, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा अघोरी प्रकार नुकताच समोर आला. प्राथमिक स्वरुपातील माहितीनुसार करणी करण्याच्या उद्देशाने गावातील एका राईस मिलच्या मागे, शेतात असणाऱ्या एका बाभळीच्या झाडाला, गावचे माजी सरपंच विठ्ठल कोडीतकर आणि इतर 2 जणांच्या फोटोला लिंबू, बिबवासह काळी बाहुली खिळ्यांनी ठोकल्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला. इतकंच नव्हे, तर आजूबाजूला टाचण्या लावलेली लिंब आणि हळदी कुंकूसुद्धा दिसून आलं.
हिरमोडी गावातील शेतकरी शेतात कामासाठी जात असताना, त्यांचं लक्ष या बाभळीच्या झाडाकडे गेल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गावाकऱ्यांनी तिथं ठिकाणी जात, झाडावर लावलेले खिळे, लिंब आणि इतर सामान काढून सामान जाळून टाकलं.
गावात घडलेल्या या प्रकारानंतर गावकऱ्यांनी तत्सम करणीचं हे सामान जाळलं असलं तरीसुद्धा ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर, गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. घडलेल्या या प्रकाराची त्वरित दखलं घेण्याची मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली असून गावाच्या परिसरात वारंवार घडणारे असे प्रकार रोखण्यासाठी गावकरी याविरोधात पोलिसात तक्रारही देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.