जावेद मुलानी, झी मीडिया
Pune News Today: दौंडमधील पोलिस उपनिरीक्षकाला तिहेरी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2018 मध्येशस्त्रागारातून पिस्तुल आणि मॅगझीन चोरून तिघांची हत्या करण्यात आली होती. अखेर या प्रकरणात 8 वर्षांनी निकाल लागला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊयात.
दौंडमध्ये कायद्याचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यानेच कायदा हातात घेत शस्त्रागारातून पिस्तुल आणि मॅगझीन चोरून तिघांची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संजय बळीराम शिंदे असं शिक्षा ठोकवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपी संजय शिंदे हा विशेष राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत होता.
2018 मध्ये दौंड मधील नगरमोरी चौक आणि जिजामाता नगर परिसरात गोपाळ शिंदे, परशुराम पवार आणि अनिल जाधव या तिघांची हत्या या आरोपीने केली होती. दौंड तालुक्यात घडलेल्या या तिहेरी हत्याकांडात न्यायालयाने कठोर निर्णय देत, तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. विशेष म्हणजे, या दंडातील ८० टक्के रक्कम पीडितांच्या कुटुंबीयांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
केवळ उसनवारीच्या वादातून आणि किरकोळ भांडणाच्या पार्श्वभूमीतून या तिघांचा खून करण्यात आला होता.घटनास्थळावरून मिळालेल्या पुंगळ्या, मृतांच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या आणि आरोपीकडून जप्त करण्यात आलेली जिवंत काडतुसे या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. या प्रकरणातील एक विशेष बाब म्हणजे, अमेरिकेतील एका बॅलेस्टीक तज्ज्ञाची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदवण्यात आली. भारतात सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरू झालेली ही साक्ष अमेरिकेत मध्यरात्री दोनच्या सुमारास झाली.
संबंधित तज्ज्ञ त्या वेळेस कोर्टासमोर हजर राहिले. या दुर्दैवी घटनेमुळे चिमुकल्यांनी आपल्या वडिलांचे छत्र गमावले आहे. कोणाचा नऊ वर्षांचा मुलगा, तर कोणाच्या तीन मुली पित्याविना पोरक्या झाल्या आहेत. आज त्यांच्या डोळ्यांसमोर एकच प्रश्न आहे कायद्याचे रक्षण करणाऱ्या व्यक्तींचे हे राक्षसी रूप आणखी किती काळ सहन करावे लागणार? या प्रकरणात सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावत, कठोर संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.