Punit Balan On Pune Ganeshotsav: पुण्याचा गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध असून, येथे दरवर्षी लाखो भाविक दहा दिवस उत्साहात हा सण साजरा करतात. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पुण्यातूनच पुढे गेली. शहरातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम यांसारख्या मंडळांचे गणपती विशेष प्रसिद्ध आहेत. पुण्यात विसर्जन मिरवणुकीत मोठी गर्दी जमते, पण शिस्तबद्ध नियोजनामुळे दुर्घटना टळतात. यंदा पर्यावरणपूरक सणासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर दीर्घकालीन धोरणासोबतच डीजेमुक्त गणेशोत्सवाची देखील चर्चा सुरु आहे. पुनित बालन यांनी यासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय.
पुण्याचा भव्य आणि ऐतिहासिक गणेशोत्सव आता फक्त शहरापुरता मर्यादित न राहता जगभर प्रसिद्ध झालाय. हा उत्सव धार्मिक रूढी आणि सांस्कृतिक परंपरेनुसार साजरा केला पाहिजे, या उद्देशाने यावर्षी डीजे वाजवणाऱ्या गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा जाहिरात दिली जाणार नाही, असे 'पुनीत बालन ग्रुप'चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी स्पष्ट केले आहे. 'समर्थ प्रतिष्ठान'च्या ढोल-ताशा पथकाच्या संगीतमय पूजा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
'पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा 132 वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. स्वातंत्र्यलढ्यादरम्यान लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. स्वातंत्र्यानंतर या उत्सवाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे पुनित बालन म्हणाले. पण अलिकडच्या काळात काही मंडळे मोठे स्पीकर लावून त्यावर अश्लील गाणी वाजवून उत्सव साजरा करतात. ज्यामुळे गणेशोत्सवाचे पावित्र्य बिघडते आणि ते आपल्या संस्कृतीला अनुसरून नाही. अशा परिस्थितीत आता डीजेमुक्त गणेशोत्सवाच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची वेळ आल्याचे पुनीत बालन म्हणाले.
पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, माणिकचंद ऑक्सिरिच आणि पुनीत बालन ग्रुप जाहिरातींच्या स्वरूपात मोठी आर्थिक मदत करत असतात. पुण्याचा गणेशोत्सव पाहायला जाणाऱ्यांना रस्त्याच्या दुतर्फा जाहिरातदारांचे बॅनर पाहायला मिळतात. डीजेवर आक्षेपार्ह गाणी वाजवून बाप्पाचे पावित्र्य भंग करणाऱ्या मंडळांना यापुढे कोणतीही मदत दिली जाणार नाही, असे आता स्पष्ट करण्यात आले आहे. आपल्या हिंदू देवी-देवतांचे उत्सव धार्मिक आणि पारंपारिक पद्धतीने साजरे केले पाहिजेत. त्यांच्या ठाम भूमिकेचे समाजातील सर्व घटकांकडून स्वागत केले जात आहे.
पुनित बालन हे एक प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. पुण्याच्या गणेशोत्सवात त्यांचा सक्रिय सहभागी असतो. त्यांच्या पुनित बालन ग्रुपतर्फे अनेक गणेश मंडळांना प्रायोजकत्व आणि सहकार्य देण्यात येते. विशेषतः पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ते शाडू मूर्तींच्या निर्मितीला प्रोत्साहन देत असतात याशिवाय त्यांच्या सामाजिक संस्थांमार्फत गरजूंना अन्नदान आणि वैद्यकीय मदत यासारखे उपक्रम गणेशोत्सवात राबवले जातात. बालन यांनी गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्वाला बळकटी देण्यासाठी मंडळांसोबत दीर्घकालीन भागीदारी केल्याचे दिसते.