Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुणेकरांनो 'हे' वाचाच! महापालिकेने नागरिकांनाच लिहिलं Open Letter

पुणेकरांसाठी महानगरपालिकेने लिहिलं थेट पत्र, कारण की....

पुणेकरांनो 'हे' वाचाच! महापालिकेने नागरिकांनाच लिहिलं Open Letter

पुणेकरांनो पाणी जपून वापरा... अशा आशयाचं विनंती पत्र पुणे महापालिकेने थेट नागरिकांनाच लिहीलं आहे. पाणी बचतीसाठी महापालिकेकडून नागरिकांना पत्र लिहीत विनंती केली जात आहे. राज्य शासनाकडून जल व्यवस्थापन पंधरावडा साजरा केला जाणार असून त्या अंतर्गत पालिकेकडून पाणी बचतीसाठीची जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. याच मोहिमेअंतर्गत पुणे महानगरपालिका आता शहरातील नागरिकांना पाणी जपून वापरण्यासाठी विनंती पत्र लिहिणार आहे 

शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढल्याने पाण्याची मागणी 10 ते 15 टक्के वाढली आहे. तसेच अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचा अपव्यय केला जातो. अशा स्थितीत, महापालिकेस धरणातून मिळणारे पाणी मर्यादीत असल्याने पाणी बचतीसाठी पालिकेकडून पत्र पाठवून जनजागृती केली जाणार आहे.

काय उपाययोजना करणार? 

पुण्यात अनेक सोसायट्या आहेत ज्या जुन्या झाल्या आहेत. अशा सोसायट्यांमध्ये पाणीच्या टाक्यांची मोठी गळती असते. यामुळे पाणी जमिनीत मुरते. तसेच टाक्या ओव्हरफ्लो होऊन पाणी वाया जातं. तसेच अनेक घरांमध्ये देखील लिकेज असते. या सगळ्या मुद्यांवरुन महापालिकेने नागरिकांना पत्र लिहिलं आहे. 

मुंबईकरही पाणीटंचाईमुळे हैराण 

मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील अनेक भागांमधील नागरिक तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत आहे. अशातच टँकर मालक संघटनेने संप पुकारल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करणे कठिण झाले आहे. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने आटू लागला असून सध्या केवळ ३१ टक्के जलसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये अधिक पाणीसाठा असला तरी दिवसेंदिवस वाढत असलेली उन्हाची तीव्रता आणि जलदगतीने होणारे बाष्पीभवन महापालिकेच्या जल विभागाच्या काळजीत भर पाडत आहे. परिणामी, मुंबईकारणांवर तीव्र पाणी संकट ओढवण्याची चिन्हे दाट होऊ लागली आहेत.

अनेक ठिकाणी पुरेसा व योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने संबंधित भागातील नागरिकांना बाटलीबंद पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत टँकर मालकांच्या संघटनेने संप पुकारला असून पाणीटंचाईमुळे मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच कडक उन्हामुळे जलद गतीने घटत चाललेल्या धरणांतील पाणीसाठ्यामुळे मुंबईकरांची जलचिंता वाढवली आहे. सातही धरणांमध्ये मिळून केवळ ३१.३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा जरी अधिक असला, तरी नजिकच्या काळात मुंबईकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

Read More