Maharashtra Travel and Tourism : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये अनके ऐतिहासिक वारसा असणाऱ्या ठिकाणांपासून काही अशी तीर्थक्षेत्रही आहेत जिथं वर्षभर पर्यटक आणि भाविकांचा राबता असतो. पावसाळा आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तर, काही ठिकाणांचं सौंदर्य दुपटीनं खुलून येतं. अशा या सुंदर महाराष्ट्राची सुंदर सैर घडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग अर्थात एसटी महामंडळानं पुढाकार घेत चार विशेष पर्यटन बससेवा प्रवाशांच्या सेवेत सादर केल्या आहेत.
रेल्वे आणि खासगी वाहनाऐवजी एसटी बसनं प्रवास करण्यास प्राधान्य देण्याऱ्यांसोबतच काही विशिष्ट ठिकाणांना भेट देण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी या बससेवा परवणी ठरणार आहेत असं म्हणायला गैर नाही. त्यामुळं आता एसटीच्या या नव्या योजनेला, या सुविधेला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं असेल.
राज्यात धार्मिक आणि सहजच केल्या जाणाऱ्या पर्यटनाची आवड असणाऱ्या अनेकांसाठी ही खऱ्या अर्थानं आनंदाची बातमी! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील स्वारगेट आगारातर्फे चार विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.
एसटी महामंडळाच्या माहितीनुसार या निमआराम बससेवांच्या माध्यमातून पाच ज्योतिर्लिंग, अक्कलकोट-गाणगापूर, अष्टविनायक आणि रायगड यांसारख्या प्रमुख स्थळांना प्रवासी भेट देऊ शकणापर आहे.
‘पाच ज्योतिर्लिंग’ दर्शन सहल - ही तीन दिवसांची सहल असून, त्यात महाराष्ट्रात असणाऱ्या पाच ज्योतिर्लिंगांना भेट देता येणार आहे. यामध्ये भीमाशंकर, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ यांमचा समावेश आहे. 19 ते 21 जुलै 2025 या दिवसांदरम्यान ही सहल आहे. ज्यात निमआराम बसनं प्रवास सुविधा दिली जाईल.
अक्कलकोट-गाणगापूर सहल - निमआराम बसनं 22 आणि 23 जुलै 2025 रोजी ही सहव पार पडणार आहे. यामध्ये तुळजापूरचाही समावेश असल्याचं म्हटलं जात आहे.
अष्टविनायक दर्शन- 25- 26 जुलै 2025 दरम्यान दोन दिवसांच्या कालावधीत निमआराम एसटीनं अष्टविनायक दर्शन घडवलं जाईल.
रायगड दर्शनासाठी- 30 जुलै 2025 रोजी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडभेटीसाठी एकदिवसीय सहल नियोजित आहे. जिथंही निमआराम बसचा वापर केला जाणार आहे.
एसटी महामंडळाच्या माहितीनुसार या प्रत्येक सहलीसाठी निमआराम बसचा वापर केला जाणार असून, तिकीट आरक्षणासंदर्भातील माहिती स्वारगेट आगारासह एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिली जाईल याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.