Pune Railway Station Rename News : पुणे रेल्वे स्टेशनचं नामांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवेंचं नाव द्या अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. थोरले बाजीराव पेशवे हे एकही लढाई हारले नाहीत. शिवाय त्यांचा मोठा इतिहास असल्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनला त्यांचं नाव देण्यात यावे अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.
पुणे रेल्वे स्टेशन नामकरण वादात राष्ट्रावादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनीही उडी घेतली. नाव द्यायचेच असेल तर मग पुणे रेल्वे स्टेशन ला महात्मा फुले किंवा गोपाळ कृष्ण गोखले यांचे द्या अशी मागणी अंकुश काकडे यांनी केली. पुणे रेल्वे स्टेशन ला श्रीमंत पेशवा यांचे नाव देण म्हणजे एका शिव भक्ताचाच नव्हे तर वंदनिय छत्रपतींचा सुद्धा सन्मान ठरेलं असं हिंदु महासंघांचे आनंद दवे म्हणाले.
पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केल्याचे समजत आहे, परंतु या नावाला आमचा विरोध आहे कारण शिवाजी महाराजांनी राज्य चालविण्यासाठी जी राज्याभिषेक शक निर्माण केली होती, तीच राज्यभिषेक शक बंद करून पेशव्यांनी फसली शक निर्माण केली तसेच रयतेचे राजे शिवाजी महाराजांची समाधी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधली आणि पुढे जाऊन शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा साजरी केली, आणि याचा उल्लेख तत्कालीन वर्तमानपत्र दिनबंधू यांमध्ये आहे तसेच स्त्री शिक्षणाचा यशस्वी लढा दिला त्यामुळे आमचा पुणे रेल्वे स्थानकाला थोरला बाजीराव पेशवे नाव देण्यास विरोध आहे आणि आमची मागणी आहे की क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव पुणे रेल्वे स्टेशनला देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट पक्ष) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केले.
स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मेट्रो मार्गिकेअंतर्गत असलेले खडकी मेट्रो स्थानक प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. हे स्थानक खडकी रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ असल्यामुळे आणि या मेट्रो स्थानकातून प्रवाशांना थेट खडकी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी मार्ग असल्यामुळे मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतूक सेवांचे या ठिकाणी एकत्रीकरण शक्य झाले आहे. हे स्थानक सुरू होणार असल्याने या परिसरातील नागरिकांना तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुणे मेट्रोच्या सेवेचा लाभ घेणे सुलभ होईल, असा दावा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशनकडून करण्यात आला आहे.