Pune Swargate Rape Case: पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्वारगेट बस स्थानकामधील 'शिवशाही' बसमध्ये मागील आठवड्यात एका तरुणीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीमध्ये रोज एक नवीन धक्कादायक खुलासा होताना दिसतोय. या प्रकरणानंतर 75 तासांनी आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे पीडितेचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. पीडितने नोंदवलेल्या जबाबामध्ये एक धक्कादायक खुलासा करताना आरोपीने लैंगिक अत्याचार करण्यापूर्वी जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली होती असं म्हटलं आहे.
आरोपी दत्ता गाडेने पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकातील एक बसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या प्रकरणाबद्दल खुलासा झाल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. बस स्थानकामध्ये सीसीटीव्ही असतानाही आरोपीचा चेहरा नीट दिसत नव्हता. अखेर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. मात्र त्यानंतरही तब्बल 75 तासानंतर पोलीस यंत्रणांना आरोपी शिरूर तालुक्यातील त्याच्या मूळ गावी गुनाट येथे पोलिसांच्या हाती लागला. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या आरोपीची चौकशी केली जात असून आरोपीच्या मोबाइलही तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
दुसरीकडे पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून तिच्यावर दोनदा लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. या तरुणीचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून तिने आरोपी दत्ता गाडेने आपल्याला गळा दाबून जीवे मारायची धमकी दिली होती असं म्हटलं आहे. बलात्कारानंतर आरोपीने आपल्याला जीवे मारू नये म्हणून विनंती केल्याचं पीडितेने पोलिसांना सांगितलं. "मी आरोपीला (दत्ता गाडेला) विनंती केली होती. 'दादा, मला जीवे मारू नको' अशी विनंती मी केली होती," असं पीडितेने म्हटलं आहे.
फलटणला जाण्यासाठी ही तरुणी बस शोधत असताना आरोपीने तिच्या जवळीक करुन बस डेपोतील एका निर्जनस्थळी नेऊन तेथील रिकामी बसच फलटणला जाणार असल्याचं सांगत तिला बसमध्ये चढण्यास सांगत तिच्या मागोमाग बसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर बसचं दार लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी या तरुणीचे फलटणला जायचे तिकीट ही पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा केलं आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील गुन्हेगार दत्तात्रय गाडे वापरत असलेला मोबाइल हा पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली. या तपासणीमधून पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ज्या बसमध्ये हा प्रकार घडला ती 'शिवशाही' बस देखील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे. गाडे विरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.