Pune News : मागील काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. मे महिन्यातच बरसणाऱ्या या अवकाळीनं अनेकांचाच गोंधळ उडवला. पूर्वनियोजित कार्यक्रमांचे तीनतेरा वाजले. पुण्यातही काही विवाहसोहळ्यांवर आणि तत्सम कार्यक्रमांवर अशीच वेळ ओढावली. पण, या पावसाच्या माऱ्यानं एक सकारात्मक गोष्टही घडवून आणली आणि एक अनोखा योग जुळून आला.
धर्मापेक्षा माणुसकी मोठी असते, हे वानवडीतील एका विवाहसोहळ्याने सिद्ध केलं. पावसाने अचानक अडचणीत आलेल्या एका कुटुंबाला मदतीचा हात दिला तो दुसऱ्या धर्मातील कुटुंबानं आणि एका वऱ्हाडाचा आधार झालं दुसरं वऱ्हाड. ही कहाणी आहे माणुसकीच्या मैत्रीची, आणि आपल्यातील एका सुंदर ऐक्याची.
पुण्यातील घोरपडीतील एसआरपीएफच्या अलंकार लॉनमध्ये कवडे आणि गलांडे कुटुंबीयांचा विवाहसोहळा मंगळवारी संध्याकाळी रंगात आला होता. फुलांच्या सजावटीपासून ते विद्युत रोषणाईपर्यंत सर्व काही उत्तम होतं, पण अचानक आलेल्या मुसळधार पावसाने हा सारा आनंद एका क्षणात चिंतेत बदलला. लग्नाचा मांडव जलमय झाला. पाहुणे, नातेवाईक आणि खुद्द नवरी-नवरदेव चिंब भिजले. लग्न थांबणार की काय, या प्रश्नाने सर्वांनाच हतबल केलं.
सारंकाही अनपेक्षित. पण, अशा कठीण वेळी एका बापासाठी दुसऱ्या बापाने हात पुढे केला तोही जात-धर्म न पाहता. शेजारील हॉलमध्ये मुस्लीम समाजातील काझी कुटुंबियांचा स्वागत समारंभ सुरू होता. संकटात सापडलेल्या कवडे कुटुंबाने जेव्हा परिस्थिती सांगितली, तेव्हा फारूक काझी यांनी एक क्षणही न दवडता आपला हॉल या मराठमोळ्या विवाहळ्यासाठी वापरण्यास दिला.
स्वतःच्या समारंभात व्यत्यय येऊनही त्यांनी हिंदू वऱ्हाडासाठी मंच मोकळा केला. चि.सौ. का. संस्कृती आणि चि. नरेंद्र यांचा विवाह त्या हॉलमध्ये पार पडला. सोहळा पूर्ण होताच काझी कुटुंबियांचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला.
धर्मापेक्षा माणुसकी मोठी असते… हे वानवडीतील एका विवाहसोहळ्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. पावसाने अचानक अडचणीत आलेल्या एका कुटुंबाला मदतीचा हात दिला तो दुसऱ्या धर्मातील कुटुंबाने... आणि एका वऱ्हाडाचा आधार झाला दुसरं वऱ्हाड... ही कहाणी आहे माणुसकीच्या मैत्रीची, आणि आपल्यातील एका… pic.twitter.com/IMqUIV5tGG
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 22, 2025
आज धर्माच्या नावावर वाद पेटताना दिसतात, पण वानवडीतील या घटनेने माणुसकीचं खरं दर्शन घडलं आहे. एकाच मंचावर दोन वेगवेगळ्या धर्मांतील विवाह पार पडणं ही केवळ योगायोगाची नव्हे, तर ऐक्याची जिवंत मिसाल ठरली असंच म्हणावं लागेस. कधी-कधी संकटं माणसातली माणुसकी जागवतात आणि वानवडीतील या विवाहसोहळ्याने हेच दाखवून दिलं. धर्म वेगळे असले, तरी आपली माणुसकी एकच असावी, याचं हे सुंदर उदाहरण आहे.