Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये आढळले काचेचे तुकडे, Video Viral

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेमध्ये एका ग्राहकाला बन मस्कामध्ये काचेचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये आढळले काचेचे तुकडे, Video Viral

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील प्रसिद्ध गुडलक कॅफेमध्ये बन मस्का खाताना एका व्यक्तीला काचेचे तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आकाश जलगी यांनी या प्रकरणाची तक्रार FDA कडे केली असून आज पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कॅफेमध्ये तपासणी केली आहे. मात्र प्रसिद्ध कॅफेमधील खाद्यपदार्थांत काचेचे तुकडे आढळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

1935 साली सुरू झालेले पुण्यातील पहिले इराणी हॉटेल असून या कॅफेतील खाद्यपदार्थांसाठी ते नेहमीच चर्चेत असते. मात्र आता कॅफे वेगळ्याच कारणांमुळं चर्चेत  आले आहे. गुरुवारी संध्याकाळी तक्रारदार आकाश जलगी हे आपल्या पत्नीसोबत गुडलकमध्ये बन मस्का खाण्यास गेले होते.मात्र, बन मस्कामध्ये अचानक कडक तुकडे लागल्यानंतर त्यांनी पाहिलं असता, त्यात काचेचे तुकडे असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये असा अनुभव येणं दुर्दैवी आहे, जर हे पोटात गेलं असतं तर मोठा अनर्थ झाला असता. या ठिकाणी कोणतीही काळजी घेतली जात नाही, असं आम्हाला जाणवलं, असं आकाश जलगी यांनी म्हटलं आहे. 

आकाश जलगी यांनी तातडीने FDA कडे ही तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आज पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी तपासणीसाठी गुडलक कॅफेमध्ये दाखल झाले.त्यांनी हॉटेलमधील स्वच्छता, किचन, आणि इतर गोष्टींची तपासणी केली, तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि हॉटेलची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.हा प्रकार कसा घडला, त्यासाठी आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत, तसेच हॉटेलच्या व्यवस्थापनाकडून माहिती घेत आहोत. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

दरम्यान या प्रकारानंतर हॉटेल व्यवस्थापनाने तात्काळ दिलगिरी व्यक्त केली आहे. असून, हॉटेलचे मालक शहराबाहेर असल्यामुळे ते परत आल्यानंतर यासंबंधित अधिक माहिती दिली जाईल, असं व्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे. झालेल्या घटनेबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, ग्राहकांच्या सुरक्षेचा आम्ही पुढेही पूर्णतः विचार करू, असं त्यांनी म्हटलं आहे.

या घटनेमुळे पुण्यातील इतर हॉटेल व्यावसायिकांसाठीही हा इशारा ठरला आहे. अशा घटना टाळण्यासाठी हॉटेलमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षा यावर लक्ष देणं गरजेचं असल्याचं सांगितलं जातं. पुण्यातील खाद्य सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. FDA आणि PMC या प्रकरणात काय कारवाई करतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Read More