Raigad News : महिला सुरक्षिततेचा मुद्दा हा कायमच ऐरणीचा प्रश्न असतो मात्र आता त्यातच महिलांसह लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नसुद्धा सातत्यानं उपस्थित केला जात आहे. काही विकृत बुद्धिच्या माणसांमुळं लहान मुलांसोबत होणारे अयोग्य प्रकार पाहताही मानसिकता आणखी किती खालावणार? हाच प्रश्न उपस्थित करत या भीषण वास्तवाविषयी विचार करायला भाग पाडत आहे. असाच एक प्रचंड किळसवाणा आणि चीड आणणारा प्रकार रायगडच्या महाड इथं घडला. (Maharashtra Crime News)
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात अत्यंत किळसवाणा आणि लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. जिथं वर्ग शिक्षिकेच्या वडिलांनीच अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याचं उघड झाल्याने परिसरातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, सदर प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी 75 वर्षीय आरोपी जगन्नाथ सूर्यवंशी याला ताब्यात घेतलं आहे. पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या वर्ग शिक्षिकेकडे शिकवणीसाठी जाते, त्याचवेळी वेळी आरोपीची नजर तिच्यावर पडली. पीडित मुलीला त्यानं चॉकलेट आणि फूल देण्याच्या बहाण्यानं तिच्याशी जवळीक साधण्यास सुरुवात केली.
इतक्यावरच न थांबता एक दिवस, 'तुला नवीन क्लासरूम दाखवतो' असं सांगत तो मुलीला एका रूममध्ये घेऊन गेला आणि तिच्याशी अश्लील चाळे केले. या किळसवाण्या आणि हादरवणाऱ्या प्रकाराची माहिती मिळताच पीडित मुलीच्या नातेवाईकांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत 75 वर्षीय व्यक्तीला अटक केली.
काही दिवसांपूर्वीच मुंबईतही अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली, जिथं गोवंडी परिसरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर क्रिकेट प्रशिक्षणाच्या नावाखाली वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 40 वर्षीय क्रिकेट प्रशिक्षकाला अटक केली. सात्यानं अशा कैक घटना उघडकीस येत असल्याचं पाहून महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी कायदा कठोर कधी होणार? हाच उद्विग्न प्रश्न सामान्यांमधून विचारला जात आहे.
रायगडच्या महाडमध्ये कोणती घटना घडली?
महाड तालुक्यात वर्ग शिक्षिकेच्या 75 वर्षीय वडिलांनी अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याची घटना घडली, ज्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
आरोपी कोण आहे आणि त्यानं काय केलं?
आरोपीचं नाव जगन्नाथ सूर्यवंशी असून, त्यानं मुलीला चॉकलेट आणि फूल देऊन जवळीक साधली आणि 'नवीन क्लासरूम दाखवतो' म्हणून तिला रूममध्ये घेऊन अश्लील चाळे केले.
या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याने पीडित नातेवाईकांच्या तक्रारीवरून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून 75 वर्षीय आरोपीला अटक केली.