प्रफुल्ल पवार, झी मीडिया, कर्जत : (Karjat News) पावसाळी सहलींसाठी किंवा अगजदी एकदिवसीय सहलींसाठी लोकप्रिय असणाऱ्या कर्जत इथं अनेक फार्महाऊस पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असतात. पण, याच कर्जतमधून नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीनं खळबळ माजली असून, त्यामुळं फार्महाऊस याच शब्दानं धडकीसुद्धा भरू शकते.
कर्जत तालुक्यातील किकवी इथं शेळीपालन व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या अंमली पदार्थ निर्मिती कारखान्याचा मुंबई पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला. पोलिसांनी किकवी येथील सावली फार्म हाऊसवर धाड टाकत तिथं केलेल्या कारवाईत तब्बल साडेपाच किलो एम डी ड्रग्ज जप्त केले.
पोलिसांच्या या कारवाईतून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 11 कोटी 5 लाख रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत 24 कोटी 50 लाख रुपये साडेबारा किलो एम डी ड्रग्ज हस्तगत करण्यात आलं असून, 1 कोटी रुपयांचा कच्चा मालदेखील पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
पूर्व उपनगर नशामुक्त करण्यासाठी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्यामार्फत अमली पदार्थ विरोधी पथक स्थापन करण्यात आलं. ज्यानंतर कर्जतला एमडी ड्रग्जची निर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि लगेचच या ठिकाणी पोलीस पथक दाखल झालं. तिथं सावली फार्महाऊसचं नाव समोर आलं. मात्र प्रथमदर्शनी तिथं शेळीपालन होत असल्याचच वास्तव समोर आलं.
पोलीस पथकानं या फार्महाऊसवर नजर ठेवली आणि अखेर अपेक्षित माहिती समोर आलीच. इथं शेळीपालनाच्या नावाखाली ड्रग्ज निर्मिती होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली पोलिसांनी लगेचच धडक कारवाई करत कोट्यवधींचा मुद्देमाल घटनास्थळाहून जप्त केला.