प्रफुल्ल पवार, झी मीडिया, पेण : अंधश्रद्धाविरोधी कायदे आणि या कायद्याच्या अंमलबजावणीचे आदेश राज्य शासनानं दिलेले असतानाही महाराष्ट्रात मात्र अद्यापही या आणि अशा कैक कृतींवर चाप बसलेला नाही. काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरात घडलेल्या घटनेनंतर आता रायगड जिल्ह्यातील पेण इथंसुद्धा जादूटोणा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या नाडे गावात पैशाचा पाऊस पाडण्यासाठी जादूटोणा करण्याचा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. स्मशानभूमीत मध्यरात्रीनंतर पैशांचा पाऊस पाडण्यासाठी जादूटोणा करण्याचा प्रकार सुरू होता ही बातमी समजताच स्थानिक ग्रामस्थांनी स्मशानभूमीत धाव घेतली. तिथं जाऊन जादूटोणा करणाऱ्या व्यक्तींना हटकले असता हा अघोरी प्रकार करणाऱ्या टोळीने ग्रामस्थांच्या अंगावर गाडी घालून पोबारा करण्याचा प्रयत्न केला.
योग्य वेळी तिथं पेण पोलिसांनी धाव घेत या टोळीतील तिघांना जेरबंद केलं. ज्यानंतरस त्यांचे इतर साथीदार फरार असल्याची माहिती समोर येत आहे. नवी मुंबई आणि गावातील काही स्थानिकांकडून स्मशानभुमी शेडमध्ये प्रेत जाळण्याच्या ठिकाणी एका जिवंत व्यक्तीला फिरवत होते. नारळ, लिंबु, शंख, मानवी कवटी, अगरबत्ती , डमरू, पेटलेला नारळ, गोमुत्र भगवे कापड , होमाच्या समिधा, हातातील नाडा, भस्माची डबी इत्यादी साहित्यांचा वापर करुन हा प्रकार सुरू होता. मात्र तो ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. याप्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार लोकांचा शोध सुरू आहे
कोल्हापुरच्या भुदरगड तालुक्यात काही दिवसांपूर्वीच आकुर्डे – महालवाडी दरम्यान असणाऱ्या कुराण नावाच्या शेतातील गवताच्या माळावर अघोरी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला. तिथं असणाऱ्या बाभळीच्या झाडाला लिंबू, दाभण, बाहुल्या अडकवण्यात आल्या होत्या. बाभळीच्या झाडावर दाबण, लिंबूमधून काही शालेय मुलींसह व्यक्तींचे फोटो देखील लटकवल्याचं समोर आलं, ज्यानंतर या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं.