प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड :(Raigad News) अलिबागपासून (Alibaug) साधारण तास- दीड तासाच्या अंतरावर असणाऱ्या रायगडच्या मुरूड (Murud) तालुक्यातील कोर्लई किल्ल्याला लागूनच असणाऱ्या विस्तीर्ण आणि खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली. ज्या क्षणी या बोटीसंदर्भातील माहिती मिळाली त्यानंतर तातडीनं सुरक्षा यंत्रणांना खडाडून जाग आली आणि तातडीनं यंत्रणा कामाला लागल्या.
समुद्रात आढळलेली ही बोट पाकिस्तानची असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. या बोटीतून काही व्यक्ती उतरल्याचा संशय असून पोलिसांनी रविवारी रात्रीच या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून सोमवारी सकाळच्या सुमारास ही नाकाबंदी हटवण्यात आली.
रायगड पोलीस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, बाँम्ब शोधक आणि नाशक पथक अशा सर्व यंत्रणा तिथं पोहोचल्या. सर्व संशयास्पद ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली. कोर्लईच्या लाईट हाऊसपासून साधारण दोन नॉटिकल मैल अंतरावर ही बोट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या सर्व घटनेबाबत पोलीस यंत्रणा काहीही बोलायला तयार नाही. जिल्हा प्रशासनानंही त्यासंदर्भात चुप्पी साधली असल्यानं सदर प्रकरणी सविस्तर वृत्त प्रतीक्षेत आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार दोन नॉटिकल मैलांवर समुद्राच्या समपातळीला लाल रंगाचा लाईट दिसत होता. परंतु तो लाईट आता मात्र तिथं दिसत नाही. रात्रीपासून पहाटेपर्यंत सर्व यंत्रणा कामाला लागल्या होत्या मात्र आता त्यासंदर्भातील सविस्तर माहिती समोर येऊ शकलेली नाही. बोटीवर असलेल्या चिन्हावरून ती पाकिस्तानी असल्याचं म्हणत मोठ्या बोटीतून काही व्यक्ती लहान बोटीत उतरल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबईपासून काही अंतरावर असणाऱ्या अलिबाग, रेवदंडा, मुरूड, आवास अशा ठिकाणांवर सुट्ट्यांच्या निमित्तानं पर्यटकांची गर्दी असते. त्यातच मागील काही वर्षांमध्ये कोर्लई किल्ला आणि नजीकचा परिसरसुद्धा केंद्रस्थानी आला असून, इथंसुद्धा पर्यटकांची ये- जा पाहायला मिळते. मासेमारी करून उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंब या कोर्लई गावात असून या भागाला पर्यटनामुळं आलेलं महत्त्वं आणि तिथं होणारी गर्दी पाहता सध्याच्या या संवेदनशील प्रसंदी यंत्रणासुद्धा प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. शिवाय सागरी प्रवासमार्गे किंवा तत्सम मार्गानं मुंबईसुद्धा अधिक जवळ असल्या कारणानं कोणताही अनुचित प्रकार घडण्याआधिकच रोखण्यासाठी म्हणून आता या बोटीतून कोण उतरलं आणि ती बोट नेमकी आली कुठून यासंदर्भातील सविस्तर तपास यंत्रणा करत आहेत.